Join us

अनंत अंबानींच्या शाही ‘प्री-वेडिंग’ सोहळ्यासाठी येणार शाही पाहुणे; १ मार्चपासून रंगणार सोहळा; नऊ पानांची पत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 7:04 AM

प्री-वेडिंग’ कार्यक्रमांच्या पहिल्या दिवसाची थीम जंगलावर आधारित आहे. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात येथील एव्हरलँडमध्ये एक संध्याकाळने होईल.

जामनगर (गुजरात) : दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ‘प्री-वेडिंग’ कार्यक्रमांची तयारी येथे पूर्ण झाली आहे. येथे येण्यासाठी मुंबईत चार्टर्ड उड्डाणेही पूर्णपणे तयार आहेत. विवाह १२ जुलै रोजी मुंबईत होणार असला तरी १ ते ३ मार्चदरम्यान होणाऱ्या ‘प्री वेडिंग’ कार्यक्रमापासूनच हे उत्सवी वातावरण सुरू होणार आहे.

लग्नाआधी सर्व पाहुण्यांना नऊ पानांची निमंत्रणपत्रिका मिळाली आहे. त्यात प्रवासाशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी जंगल थीम

‘प्री-वेडिंग’ कार्यक्रमांच्या पहिल्या दिवसाची थीम जंगलावर आधारित आहे. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात येथील एव्हरलँडमध्ये एक संध्याकाळने होईल.

पहिली पार्टी १ मार्चला होणार असून त्यात वेगळा आणि शोभिवंत ड्रेस कोडही असेल. हे सर्व कार्यक्रम जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केले जाणार आहेत.

येथे सुमारे १ कोटी वृक्ष-रोपे आहेत आणि इतकेच नाही तर आंब्याची सर्वांत मोठी बागदेखील येथे आहे. जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाचे जुने निवासस्थान आहे. जिथे या दोघांच्या लग्नाचे काही कार्यक्रम होणार आहेत.

‘मेला’ रुज नाइटचे आकर्षण

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची थीम ‘अ वॉक ऑन द वाइल्ड साइड’ अशी असेल. या कालावधीत पाहुणे जंगल फिवरवर आधारित वस्त्रे परिधान करतील.

जामनगरमध्ये सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांचे सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे त्यास पाहुणे भेट देतील, अशी शक्यता आहे. रात्र ‘मेला’ रुज नाईटसाठी राखीव आहे. यात पाहुण्यांना नृत्याची संधी आहे.

‘टस्कर टेल्स’ नाटक

कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशीचा (३ मार्च) अजेंडा ‘टस्कर टेल्स’ आहे. कदाचित रिलायन्स ग्रीन्समध्ये वाचवलेल्या हत्तींवर आधारित हे नाटक असेल.

यावेळी पाहुणे ‘कॅज्युअल चिक’ पर्याय निवडू शकतात. या कार्यक्रमानंतर ‘हस्तक्षर’ हा कार्यक्रम येतो, ज्याचा ड्रेस कोड ‘हेरिटेज इंडियन’ म्हणून ठेवण्यात आला आहे.

पाहुण्यांच्या यादीत नेमके कोण?

पाहुण्यांच्या यादीत मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग, मॉर्गन स्टॅनलेचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ॲडनॉकचे सीईओ सुलतान अहमद अल जबर आदींचा समावेश आहे.