Join us

23 हजार बँक घोटाळ्यांमुळे 1 लाख कोटींचा फटका, रिझर्व्ह बँकेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 9:22 PM

मागील पाच वर्षांत देशातील विविध बँकांत तब्बल २३ हजार बँक घोटाळे उघडकीस आले असून, या घोटाळ्यांमुळे बँकांना १ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत देशातील विविध बँकांत तब्बल २३ हजार बँक घोटाळे उघडकीस आले असून, या घोटाळ्यांमुळे बँकांना १ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार अर्जावर ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २0१७ ते १ मार्च २0१८ या वर्षभराच्या काळात सर्वाधिक ५,१२५ बँक घोटाळे उघडकीस आले.या काळात सर्वाधिक २८,४५९ कोटी रुपयांची रक्कम घोटाळ्यात अडकली. २0१६-१७ मध्ये ५,0७६ बँक घोटाळे उघड झाले. या घोटाळ्यात अडकलेली रक्कम २३,९३३ कोटी रुपये होती. २0१३ ते मार्च २0१८ या काळात २३,८६६ बँक घोटाळे उघडकीस आले. त्यापैकी प्रत्येक घोटाळ्यातील रक्कम १ लाख रुपयांपेक्षा अधिक असून सर्व घोटाळ्यांत मिळून १,00,७१८ कोटी रुपयांचा फटका बँकांना बसला आहे.रिझर्व्ह बँकेने म्हटले की, २0१५-१६ मध्ये ४,६९३ बँक घोटाळे झाले. त्यात बँकांना १८,६९८ कोटी रुपयांचा फटका बसला. २0१४-१५ मध्ये ४,६३९ घोटाळे झाले. त्यातून बँकांचे १९,४५५ कोटी रुपये बुडाले. २0१३-१४ मध्ये ४,३0६ घोटाळ्यांत बँकांचे १0,१७0 कोटी रुपये बुडाले.रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या घोटाळ्यांप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. अनेक घोटाळ्यांची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोकसी यांनी घडविलेला १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा यात प्रमुख आहे. हे दोन्ही आरोपी विदेशात फरार झाले आहेत.

टॅग्स :पैसा