Join us

तब्बल १,२७८ कोटी रुपयांचे टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस, बनावट बिलांद्वारे केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 3:35 AM

tax credit racket News : अत्यंत सुस्थापित टोळीकडून हे रॅकेट चालविले जात होते. सात वेगवेगळ्या बनावट संस्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली १३७ कोटी रुपयांची इनपूट क्रेडिट बिले या टोळीकडे सापडली आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या (सीजीएसटी) दिल्लीतील  करचोरीविरोधी शाखेने १,२७८ कोटी रुपयांचे इनपूट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. बनावट बिलांच्या माध्यमातून हे रॅकेट चालविले जात होते, असे सूत्रांनी सांगितले.दिल्लीचे सीजीएसटी आयुक्त प्रेम वर्मा यांनी सांगितले की, अत्यंत सुस्थापित टोळीकडून हे रॅकेट चालविले जात होते. सात वेगवेगळ्या बनावट संस्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली १३७ कोटी रुपयांची इनपूट क्रेडिट बिले या टोळीकडे सापडली आहेत. त्यांची एकूण बनवेगिरी १,२७८ कोटी रुपये असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. करचोरीविरोधी शाखेने दिल्ली आणि हरियाणातील नऊ ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. ही टोळी कोणत्याही प्रकारे वस्तूंची देवाणघेवाण न करता बनावट ई-वे बिले तयार करीत असे. नंतर या बिलावर इनपूट टॅक्स क्रेडिट उचलले जात असे.आयुक्तांनी सांगितले की, या टोळीचा म्होरक्या आशिष  अगरवाल नावाची एक व्यक्ती आहे. त्यास गुरुवारीच अटक करण्यात आली आहे. मागील ६० दिवसांपासून तो फरार होता. |कागदोपत्री अस्तीत्व असलेल्या संस्था प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, माया इम्पेक्स या संस्थेला रॅकेटचा थेट लाभ मिळाल्याचे दिसून येत आहे. ही संस्था अगरवाल याच्या आईच्या नावावर नोंदणीकृत आहे. अगरवाल याने दूध, दही आणि तूप पुरवठ्याचा व्यवसाय कागदोपत्री दाखविला होता. या वस्तूंच्या पुरवठ्याची खोटी बिले तो तयार करीत असे. ज्या संस्थांना या वस्तू पुरविण्यात आल्याचे दाखविण्यात आले, त्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. केवळ कागदोपत्री त्यांचे अस्तित्व आहे.

टॅग्स :करगुन्हेगारी