मुंबई : २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्या बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे. तोवर त्या बँकांत जमा करता येतील. ३० सप्टेंबरनंतर काय? याबाबत आरबीआयने अद्याप काही म्हटलेले नाही.
रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की, २ हजारांच्या नोटा जारी करणे तत्काळ थांबविण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी २ हजारांच्या नोटेचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई २०१८-१९ मध्येच बंद केली होती.
का घेतला निर्णय?रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ‘स्वच्छ नोट धोरणा’चा पाठपुरावा म्हणून २ हजारांची नोट चलनातून मागे घेण्यात येत आहे. वास्तविक, ही नोट तशी फारशी चलनात नव्हती.
का आणली होती २ हजारांची नोट?नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोठ्या संख्येने नोटा चलनातून अचानक बाद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी मोठ्या चलनी नोटेची गरज होती. त्यामुळे २ हजारांची नोट सरकारने चलनात आणली होती.प्लीज नोट - बँकेत नोटा बदलून घेण्यास, जमा करण्यास, ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, चलनात कायम राहणार.
घाबरू नका - बँकांमधूनच २ हजारच्या नोटा मिळणार नाहीत, इतर नोटांची चणचणही भासणार नाही
पुढे काय? समजून घ्या...नोटांचे काय करावे? ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नाेटा बँकांमध्ये जमा करता येतील किंवा त्या इतर चलनी नाेटांमध्ये बदलून घेता येतील. यासाठी काेणत्याही अटी नाहीत.
कधीपासून मिळतील नोटा बदलून?चलनातून मागे घेण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना २३ मे २०२३ पासून बँकांमध्ये बदलून देण्यास सुरुवात केली जाईल. ही प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहील. आरबीआयच्या १९ विभागीय शाखांमध्येही २० हजार रुपयांपर्यंतच्या नाेटा बदलून मिळतील. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
किती नोटा एकाच वेळी बदलता येतील?सध्या एकाच वेळी २० हजार रुपयांची मर्यादा आहे. म्हणजे एका वेळी १० नोटा बँकांमध्ये जमा करता येतील. बँक खात्यात जर २००० च्या नोटांच्या स्वरुपात रक्कम जमा करायची असेल, तर त्यावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.
२० हजार रुपयांचीच मर्यादा का?बँकांचे नियमित कामकाज विस्कळीत होऊ नये, तसेच परिचालन सुविधा कायम राहावी यासाठी २ हजारांच्या नोटा बँकांतून बदलून घेण्यासाठी एका वेळी २० हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. बँकांनाही तसे नियोजन करावे लागणार आहे.
चलनातील नोटा कमी होतील काय?२ हजार रुपयांच्या नाेटांचा व्यवहारातील वापर कमी झाला आहे. तसेच इतर नाेटांचा साठा जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण कमी होणार नाही. मात्र, २००० ची नोट ‘वैध चलन’ (लीगल टेंडर) म्हणून कायम राहणार आहे.