Join us

बँकांमध्ये जमा ४२,२७० कोटी रुपयांना कुणीही वाली नाही; या पैशांचे पुढे काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 9:25 AM

मार्च २०२३ मध्ये या रक्कमेत २८ टक्क्यांची वाढ झाली. अनक्लेम्ड डिपॉझिट कमी करण्यासाठी आरबीआय सातत्याने पाऊले उचलत आहे. 

नवी दिल्ली -  बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अनक्लेम्ड डिपॉझिटची रक्कम २८ टक्क्यांनी वाढली आहे. बँकांमध्ये जमा असलेली ही रक्कम जवळपास ४२ हजार २७० कोटी इतकी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च २०२३ पर्यंत बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींची रक्कम ४२ हजार कोटींवर पोहचली आहे. जी मार्च २०२२ मध्ये ३२ हजार ९३४ कोटी इतकी होती. बँकांमध्ये ठेवलेल्या या रक्कमेवर कुणीही दावा केला नाही.

४२ हजार २७० कोटी रक्कमेपैकी सरकारी बँकांकडे ३६ हजार १८५ कोटी तर खासगी बँकांमध्ये ६ हजार ८७ कोटी इतकी रक्कम आहे. बँकांमध्ये जमा असलेल्या पैशावर जर कुणी १० वर्ष किंवा त्याहून अधिक दावा केला नाही तर ही रक्कम अनक्लेम्ड डिपॉझिट म्हणून गणली जाते. त्यानंतर दावा न केलेली रक्कम बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डीआय फंडात पाठवतात.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत माहिती दिली की, मार्च २०२१ पर्यंत सरकारी बँकांमध्ये २३ हजार ६८३ कोटी आणि खासगी बँकांमध्ये ४१४१ कोटी रुपये होते. हीच रक्कम २०२२ मध्ये वाढून सरकारी बँकांत २७ हजार ९२१ तर खासगी बँकांमध्ये ५ हजार १३ कोटी रुपये अनक्लेम्ड डिपॉझिट होते. मार्च २०२३ मध्ये या रक्कमेत २८ टक्क्यांची वाढ झाली. अनक्लेम्ड डिपॉझिट कमी करण्यासाठी आरबीआय सातत्याने पाऊले उचलत आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक