नवी दिल्ली : कर्ज सुविधेचा लाभ न मिळणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुद्रा कर्ज योजनेंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांनी १२ कोटी लोकांना ६ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली.एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांनी मुद्रा कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांसोबत वार्तालाप केला, त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, मुद्रा कर्ज योजनेच्या १२ कोटी लाभार्थ्यांपैकी २८ टक्के म्हणजेच ३.२५ कोटी लाभार्थी पहिल्यांदाच व्यवसायात उतरलेले आहेत. यात ७४ टक्के म्हणजेच ९ कोटी कर्जदार महिला आहेत. ५५ टक्के कर्जदार एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत. मोठ्या उद्योजक व कंपन्यांपेक्षा गरीब लोक घेतलेले कर्ज वेळेत व नियमितपणे फेडतात, असेही ते म्हणाले.व्यावसायिक बँका, विभागीय ग्रामीण बँका, लघू वित्त बँका, सहकारी बँका, सूक्ष्म वित्त संस्था आणि बिगर बँकीय वित्त संस्था यांच्यामार्फत हे कर्ज दिले जाते. यापैकी कोणत्याही संस्थेशी कर्ज इच्छुक थेट संपर्क करू शकतो अथवा आॅनलाइनही अर्ज करू शकतो. व्यावसायाच्या स्वरूपानुसार मुद्रा कर्जाचे तीन प्रकार करण्यात आले आहेत. शिशू, किशोर आणि तरुण अशी त्यांची नावे आहेत. व्यवसायाची वृद्धी, विस्तार आणि गरज यानुसार हे प्रकार ठरतात.पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) या नावाने ही योजना ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी ही योजना सुरू केली होती. या योजनेत बिगर उद्योजकीय, बिगर शेती आणि सूक्ष्म व छोट्या व्यावसायिकांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
१२ कोटी लाभार्थ्यांना दिले ६ लाख कोटींचे मुद्रा कर्ज - मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:27 AM