Join us

कर्मचाऱ्यांचे ९१ हजार कोटी रुपये ईएसआय रिझर्व्ह फंडामध्ये पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:01 AM

उद्योग क्षेत्रातील संघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षेकरिता संबंधित कंपनी तसेच कामगारांकडून दर महिन्याला ‘ईएसआय’ला विमा हप्ता भरला जातो.

बाळकृष्ण दोड्डी।

सोलापूर : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात ईएसआयकडे राज्यभरातील ३ कोटी १९ लाख कमर्चाऱ्यांची ९१ हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. तसेच २३ हजार १५१ कोटी रुपये रिझर्व्ह फंड म्हणून शिल्लक आहे. कोरोना काळातही विमा रक्कम कामगारांत वाटावी त्यामुळे कामगारांना दिलासा मिळेल. घरी बसून असलेले तसेच बेरोजगार झालेल्या कामगारांना अर्थसाहाय्य मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी मदत होईल, अशी मागणी क्लोदिंग मॅन्युफॅक्चर आॅफ असोसिएशन इंडियाने पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्याकडे केली आहे.

उद्योग क्षेत्रातील संघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षेकरिता संबंधित कंपनी तसेच कामगारांकडून दर महिन्याला ‘ईएसआय’ला विमा हप्ता भरला जातो. कोरोना ही जागतिक महामारी आहे. या आपत्तीकाळात ‘ईएसआय’कडून कामगारांना विविध पातळीवर अर्थसाहाय्य देणे गरजेचे आहे, याकडे क्लोदिंग मॅन्युफॅक्चर आॅफ असोसिएशन इंडियाने लक्ष वेधले आहे.‘ईएसआय’कडे शिल्लक विमा रक्कम तर कामगारांच्या हक्काची रक्कम आहे. लॉकडाऊनमुळे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत, तर काही कामगार घरात बसून आहेत. अशा कामगारांना त्यांच्या नियोजित पगारापैकी ५० टक्के रक्कम ‘ईएसआय’कडून मिळावी. आपत्ती काळात कामगारांना मदत करण्याची नैतिक जबाबदारी ‘ईएसआय’ची आहे. याबाबत पंतप्रधानांना निवेदन दिले आहे तसेच प्रशासकीय पातळीवरही यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.- संतोष कटारिया, सहसचिवक्लोदिंग मॅन्युफॅक्चर आॅफ असोसिएशन इंडिया

टॅग्स :शेतकरीपैसा