नवी दिल्ली - योगगुरू बाबा रामदेव यांनी रुची सोया इंडस्ट्रीजचा (Ruchi Soya) FPO आणण्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी या संदर्भात माहिती दिली. "रुची सोया ही आता केवळ कमॉडिटी कंपनी राहिलेली नाही. तिच्याकडे आता FMCG, फूड बिझनेस आणि न्यूट्रास्युटिकल्ससह इतर व्हर्टिकल आहेत" असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. याच दरम्यान, रुची सोयाचा (Ruchi Soya) FPO 24 मार्च 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध होईल. या पब्लिक ऑफरला 28 मार्चपर्यंत सबस्क्राइब करता येईल.
SBI कॅपिटल मार्केट्स, एक्सिस कॅपिटल आणि ICICI सिक्युरिटीज हे या इश्यूचं व्यवस्थापन करणारे गुंतवणूक बँकर आहेत. या FPO च्या माध्यमातून कंपनी 4,300 कोटी रुपये उभारणार आहे. रुची सोयाने FPO साठी प्रतिशेअर 615-650 रुपयांचा प्राईज बँड सेट केला आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितलंय की कंपनीच्या इश्यू कमिटीने FPO साठी प्रतिशेअर 615 रुपये फ्लोअर प्राईस आणि प्रतिशेअर 650 रुपये कॅप किंमत मंजूर केली आहे. तर, स्टॉक फायलिंगमध्ये, कंपनीने म्हटलंय की, FPO साठी कमीतकमी लॉट आकार 21 शेअर्सचा आहे.
FPO चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला किमान 21 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. अशाप्रकारे, तुम्हाला रुची सोया या ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये रुची सोया ही कंपनी विकत घेतली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुरुवारी जेव्हा शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर रुची सोयाच्या समभागाचे मूल्य 1,004.45 रुपये होते. म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत कंपनीने 35 टक्क्यांनी कमी किंमत लावली आहे. एवढ्या मोठ्या डिस्काऊंटने हे शेअर्स विकले जाणार आहेत.
FPO अंतर्गत शेअर्सचे वाटप 4 एप्रिल 2022 रोजी केले जाईल. कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2022 रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील आणि दुसऱ्या दिवसापासून ट्रेडिंग सुरू होईल. ज्या गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये यश मिळणार नाही, त्यांना 4 एप्रिलपासून परतावा मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे जर शेअर मिळाले तर पुढील पंधरा दिवसांत एवढ्या खाली कंपनीचा शेअर येणार नाही. यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होण्याची शक्यता आहे. कंपनीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची परवानगी मिळाली होती.