Rule Change: यूपीआय लाइटच्या युझर्ससाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्या यूपीआय लाइट प्लॅटफॉर्ममध्ये १ नोव्हेंबर २०२४ पासून दोन मोठे बदल होणार आहेत. बदलाबद्दल बोलायचं झालं तर १ नोव्हेंबरपासून यूपीआय लाइट युजर्स अधिक पेमेंट करू शकणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) नुकतीच यूपीआय लाइटच्या व्यवहाराच्या मर्यादेत वाढ केली आहे.
दुसऱ्या बदलाबद्दल बोलायचं झाले तर, १ नोव्हेंबरनंतर जर तुमचा यूपीआय लाइट बॅलन्स एका विशिष्ट मर्यादेच्या खाली गेला तर नवीन ऑटो टॉप-अप फीचर यूपीआय लाइटमध्ये पुन्हा पैसे अॅड करेल. यामुळे मॅन्युअल टॉप-अपची गरज संपणार असून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI Lite) लाइटच्या मदतीनं नॉन-स्टॉप पेमेंट करता येणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
केव्हा सुरू होणार नवं फीचर?
UPI Lite ऑटो टॉप अप फीचर १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यूपीआय लाइट हे एक वॉलेट आहे जे युझर्सना यूपीआय पिन न वापरता छोटे व्यवहार करण्याची परवानगी देते. सध्या यूपीआय लाइट युजर्सना पेमेंट सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून वॉलेट बॅलन्स मॅन्युअली रिचार्ज करावा लागतो. परंतु, नवीन ऑटो-टॉप-अप फीचरसह, नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मॅन्युअल रिचार्जची आवश्यकता दूर करून प्रक्रिया सुलभ करण्याच्या प्रयत्नात आहे. एनपीसीआयनं २ ऑगस्ट २०२४ ला अधिसूचनेद्वारे यूपीआय लाइट ऑटो-पे बॅलन्स फीचरची घोषणा केली होती.
UPI Lite चं लिमिट किती?
यूपीआय लाइट प्रत्येक युझरला ५०० रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी देते. यासह यूपीआय लाइट वॉलेटमध्ये जास्तीत जास्त २००० रुपये ठेवता येतात. यूपीआय लाइट वॉलेटमध्ये दररोज खर्च करण्याची मर्यादा ४००० रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) यूपीआय लाइटची कमाल व्यवहार मर्यादा ५०० रुपयांवरून १,००० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच यूपीआय लाइट वॉलेटची मर्यादा ही २,००० रुपयांवरून ५,००० रुपये करण्यात आली आहे.