नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत, आता १ जुलैपासून बँकाच्या नियमात बदल होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकांच्या बदलेल्या नियमांबद्दल जाणून घ्यायला हवं, अन्यथा त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. यामध्ये एटीएममधून कॅश काढण्यासाठी, मिनिमम बँलेन्ससारख्या अनेक सुविधांमध्ये बदल होणार आहे.
कोरोना व्हायरस महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यावरील सर्व प्रकारचे चार्ज हटवले आहेत. ही सूट १ एप्रिलपासून ३ महिन्यापर्यंत म्हणजे ३० जूनपर्यंत देण्यात आली आहे. आता १ जुलैपासून एटीएममधून रोकड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारे सूट मिळणार नाही, पूर्वीप्रमाणे त्यावर चार्ज लावण्यात येतील.
कोरोना संकटामुळे अनेकजण घरी बसले होते, लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या जाण्याचं संकट कर्मचाऱ्यांवर होते, कोणत्याही प्रकारे आर्थिक देवाणघेवाण सुरु नव्हती, त्यामुळे सर्व बँकांनी बचत खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवण्याचे नियम शिथिल केले होते, बँकांनी दिलेली ही सूट ३० जून रोजी संपुष्टात येणार आहे. म्हणजे १ जुलैपासून जर तुमच्या बचत खात्यात पर्याप्त बॅलेन्स नसेल तर त्यावर दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवणे गरजेचे आहे.
पंजाब नॅशनल बँकने १ जुलैपासून बँक बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. आता या बँकेत बचत खात्यावर जास्तीत जास्त ३.२५ टक्के व्याज मिळेल. ५० लाखापर्यंत बँलेन्सवर ३ टक्के तर ५० लाखांवरील बॅलेन्सवर ३.२५ टक्के व्याज देण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनेही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.