Fastag News Rules: आजपासून म्हणजेच सोमवारपासून फास्टॅगशी संबंधित नियम बदलत आहेत. जर तुम्ही तुमचा फास्टॅग रिचार्ज केला नसेल किंवा इनअॅक्टिव्ह किंवा बंद असेल किंवा काळ्या यादीत टाकला असेल तर तो ताबडतोब रिचार्ज करून अॅक्टिव्हेट करा. अन्यथा तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागू शकतात.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं जारी केलेले नवे नियम १७ फेब्रुवारीपासून लागू होत आहेत. वाहनचालकांना टोल नाके ओलांडण्याच्या किमान ६० मिनिटे आधी किंवा टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनी फास्टॅग रिचार्ज करावा लागणार आहे. तसं न केल्यास त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल.
टोलनाक्यांवरील गर्दी कमी होणार
टोलनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि टोल टॅक्ससंदर्भातील नियमांचं योग्य प्रकारे पालन व्हावं, यासाठी नियम सोपे करण्यात आले असून, त्याचे आता काटेकोरपणे पालन केलं जाणारे.
फास्टॅग काळ्या यादीत कधी टाकणार?
- जर मालकानं आपलं फास्टॅग खातं रिचार्ज केलं नसेल.
- परिवहन विभागासोबत कोणत्याही प्रकारचा वाद असेल.
- जर खात्यात केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर अशा परिस्थितीत तुमचं फास्टॅग काळ्या यादीत टाकलं जाऊ शकतं.
- वाहनचालकांनी टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी आपला फास्टॅग रिचार्ज करावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दंड टाळता येईल, असं परिवहन विभागानं वाहनचालकांना सांगितलंय. जोपर्यंत हे प्रकरण निकाली निघत नाही, तोपर्यंत फास्टॅग खातं निष्क्रिय राहणार आहे.
हे नियम माहीत असायला हवेत
जर तुम्ही टोल प्लाझावरून जाणार असाल आणि फास्टॅग खात्यात पैसे नसतील. अशा तऱ्हेने फास्टॅग स्कॅन करण्याच्या किमान ६० मिनिटं आधी किंवा १० मिनिटांनी रिचार्ज करा, अन्यथा तुमचे पेमेंट अवैध मानलं जाईल. मुदतीत रिचार्ज केल्यास लगेच केवायसीही करावं लागेल.
तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही टोल प्लाझावरून जाल, पण वेळेवर रिचार्ज न केल्यास तुम्हाला दुप्पट कर भरावा लागेल. पुढच्या वेळी रिचार्ज केल्यावर ती रक्कम आधी कापली जाईल.
या प्रकरणातही दुप्पट टोल टॅक्स
सरकारनं सर्व वाहनांना (दुचाकी वगळता) फास्टॅग असणे बंधनकारक केले आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या ड्रायव्हरचं फास्टॅग अकाऊंट बंद असेल किंवा त्यात पैसे नसतील तर तो ऑफलाइन म्हणजेच कॅश पेमेंटही करू शकतो. पण असं करताना तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.