मंगळवारी रुपयाने प्रथमच प्रति डॉलरमागे ८० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षभरात रुपयाचे मूल्य सुमारे सात टक्क्यांनी घसरले आहे. तर २०१४ पासून रुपया डॉलरच्या तुलनेत २५ टक्क्यांनी तुटला आहे.
मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीदरम्यान रुपयाने घसरणीचा नवा विक्रम केला. रिझर्व्ह बँकेने प्रयत्न करूनही रुपया सावरू शकलेला नाही. इंटरबँक फॉरेक्स एक्स्चेंजच्या व्यापारात रुपया निचांकी पातळीवर होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 80 होणे हा रुपयासाठी महत्त्वाचा मानसशास्त्रीय आधार मानला जात होता. रुपया 80.0175 प्रति डॉलरवर व्यापार करत आहे.
सोमवारी रुपया प्रति डॉलर 79.9775 वर बंद झाला होता. तो घसरून 80.0175 वर आला आहे. युपीए सरकार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुपया जसजसा घसरतो, तसतशी देशाची प्रतिमा कोसळते अशी टीका तत्कालीन रुपयाच्या घसरणीवर केली होती. परंतू मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच २०१४ पासून रुपयाच्या मुल्यात २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या दोन दशकांत डॉलर आणि युरोची व्हॅल्यूदेखील समान पातळीवर आली आहे. युरो हा डॉलरच्या वरती असायचा. रुपया वर्षभरापूर्वी 74.54 च्या स्तरावर होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी रुपयाच्या घसरणीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, रशिया युक्रेनमधील युद्ध हे कारण दिले आहे.
बाजारातील तज्ज्ञांनुसार गेल्या काही महिन्यांत युरोपीय संघाच्या बाजारातील मंदीची भीती लक्षात घेऊन जगभरातील गुंतवणूकदार तुलनेने सुरक्षित अमेरिकी बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे डॉलर युरोपीय चलन, आशियाई चलन यांच्या तुलनेत मजबूत होत आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे तेथील गुंतवणूकदार परदेशातून आपली गुंतवणूक कमी करून देशांतर्गत बाजारपेठेत पैसे गुंतवत आहेत, त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे.