मुंबई - महागाई नियंत्रणात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना जुलै महिन्यात काही प्रमाणात अपेक्षित यश मिळाले. पण त्याचवेळी रुपया कमकुवत झाल्याने आता इंधनदर भडकण्याची भीती निर्माण आहे. रुपया थोडा जरी सक्षम झाला तर, महागाई दरात आणखी घट होईल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली.वाढत्या इंधनदरांमुळे एप्रिल-मे महिन्यात महागाई दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातील पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात चार वर्षांनंतर पाव टक्का वाढ केली. या पाव टक्का वाढीनंतर वैयक्तिक कर्जांमार्फत बाजारात येणारा अतिरिक्त पैसा थांबेल. त्यातून क्रयशक्ती कमी होऊन महागाई नियंत्रणात येईल, असा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न होता. या प्रयत्नांना जुलै महिन्यात काही प्रमाणात यश येत महागाई दरात जवळपास पाऊण टक्का घट झाली. पण त्याचवेळी मागील दोन दिवसांत रुपया कमकुवत झाल्याने पुन्हा इंधनदर वधारण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांवर विरजण पडण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या अर्ध वर्षात महागाई दर ४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जुलैचा महागाई दर ५ वरून ४.१७ टक्क्यांवर आणण्यात बँकेला यश मिळाले आहे. पण रुपया कमकुवत झाल्याने इंधनदर वाढल्यास महागाई दर पुन्हा ५ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो. त्याचवेळी सरकारने खरिपाच्या पिकांना दीडपट हमीभाव घोषित केला आहे. हा खरिपाचा माल पुढील महिन्यापासून बाजारात येईल. त्या वेळी धान्य व भाजीपाल्याचे दर वाढलेले असतील. त्यातून महागाई दर ०.७३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. यामुळेच येत्या १५ दिवसांत रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत न झाल्यास रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न निष्फळ ठरतील, असे स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांचे म्हणणे आहे.आॅक्टोबरचे पतधोरण महत्त्वाचेसलग दोन वेळा रेपो दरात वाढ केल्यानंतर महागाई दर काहीसा आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने आॅक्टोबरच्या पतधोरण आढावा बैठकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.रिझर्व्ह बँक यापुढील पतधोरण आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित करणार आहे. जुलैप्रमाणेच आॅगस्ट महिन्यातही महागाई दरात घसरण झाल्यास त्या पतधोरणात रेपो दर स्थिर ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामुळेच आॅक्टोबरचे पतधोरण बाजारासाठी महत्त्वाचे असेल.
रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांवर रुपयाचे ‘विरजण’, महागाई दरात घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:48 AM