Join us  

डॉलरच्या समोर रुपया घसरगुंडीवर... भार सामान्यांच्या खिशावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 6:53 AM

रिझर्व्ह बँकेच्या अथक प्रयत्नानंतरही रुपया यंदा ४.५ टक्क्यांनी घसरला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून, आयात होणाऱ्या अनेक वस्तू यामुळे महाग होत आहेत.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत ते १२५ डॉलर प्रति बॅरल या स्तरावर गेले आहे. महागाईचा आगडोंब उसळण्यासह बाजारांमध्ये विक्रीचा मारा वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची पत ऐतिहासिक ढासळली आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी कोसळून नीचांकी स्तरावर म्हणजेच ७७.९३ वर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अथक प्रयत्नानंतरही रुपया यंदा ४.५ टक्क्यांनी घसरला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून, आयात होणाऱ्या अनेक वस्तू यामुळे महाग होत आहेत.

यांना फायदा- विदेशातून अधिक पैसा भारतात येणार- आयटी क्षेत्राला मोठा फायदा- निर्यातदारांना डॉलर भक्कम झाल्याने अधिक रक्कम मिळणार- पर्यटन क्षेत्र फायद्यात राहणार, विदेशी पर्यटकांसाठी भारत दर्शन स्वस्त

रशियाने दिला झटका

- रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास नकार दिल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. - भारतातील दोन सरकारी तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांची तेलखरेदीबाबत रशियन कंपनी रोसनेफ्टशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, ती अयशस्वी ठरली आहे. - कच्च्या तेलाची किंमत १३ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली असून रुपयाही घसरत आहे. यामुळे तेल आयात महाग झाली आहे.

आणखी किती घसरणार? अमेरिकेत महागाई वाढत असून, येणाऱ्या काही महिन्यांत रुपयाची पत आणखी ढासळणार आहे. रुपया घसरून ८० रुपये प्रति डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, अशी माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली.अमेरिका रुपयाला पाडणार?अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बँक १५ जून रोजी महागाई रोखण्यासाठी पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करणार आहे. त्याचाही परिणाम म्हणून रुपयात घसरण होत आहे.

टॅग्स :व्यवसाय