जगभरात अमेरिकेच्या डॉलरला असामान्य महत्त्व आहे. डॉलरची कमी-जास्त होणारी किंमत जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असते. आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहारातील डॉलर हे मुख्य चलन असल्याने त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि देशांच्या परकीय चलनांवर होत असतो. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर, रुपया हा डॉलरच्या तुलनेत वारंवार घसरताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घट हा एक कायमचा प्रवास आहे. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी एका डॉलरला साधारणतः ३.३० रुपये मोजावे लागत होते. नंतर पुढे, २०१० साली एक डॉलरसाठी भारतीयांना ४६ रुपये मोजावे लागत होते जे आज, जुलै २०२२ मध्ये एका डॉलरला जवळपास ८० रुपये मोजावे लागत आहेत.
१९५० पासून काही अपवाद वगळता डॉलरच्या तुलनेत रुपया नेहमी घसरत आला आहे. पण मागील एक दशकाचा विचार केला तर रुपया घसरण्याचा वेग वाढला आहे. देशातील अनेक पक्ष डॉलर आणि आणि रुपया सम पातळीवर आणू (जे सहजासहजी शक्य नाही), महागाई कमी करू अशा घोषणा देऊन सत्तेवर आले आणि गेले. पण देशातील महागाई काही कमी झाली नाही. सध्या देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई चिंतेचे विषय बनले आहेत. जगभरात मंदीची परिस्थिती असल्याने भारतातही महागाई वाढल आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केलंय. आंतरराष्ट्रीय बऱ्याच जणांना वाटते की रुपया कितीही घसरला तर काय फरक पडणार? पण रुपयाच्या घसरण्याने त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम सामान्यांच्या खिशावर पडत असतो. उदा. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या वाढत्या किंमती.
वर्ष | डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत | वर्ष | डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत |
---|---|---|---|
जानेवारी १९४८ | ३.३१ | १९९५ | ३२.४३ |
१९५५ | ४.७४ | २००० | ४४.९४ |
१९७० | ७.५ | २०१० | ४५.७३ |
१९८० | ७.८६ | २०१४ | ६२.३३ |
१९९० | १७.५ | २०१७ | ७०.०९ |
१९९१ | २२.७४ | जुलै २०२२ | ७९.८७ |
कोरोना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जागतिक अर्थकारण बिघडले?
सध्या देशात इंधन दर प्रचंड वाढले आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर तिथेही महागाई प्रचंड वाढली आहे. अमेरिकेत २०२० साली १.२३ टक्के असणारा महागाई दर आता जुलै २०२२ मध्ये वाढून तब्बल ९.१ पर्यंत गेला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील अस्थिरता जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम करते. त्यामुळेच जर आज अमेरिकेतील अर्थचक्रे बिघडली असतील तर त्याचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थांना बसणार आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेसोबत जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला.
कोरोनाकाळात जागतिक उत्पादन आणि व्यापार मंदावला होता. त्याचबरोबर ज्यो बायडन यांच्याआधी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष राहिलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगळ्या धोरणांमुळे जगभरातील व्यापार साखळी तुटली होती. वस्तूंची तूट निर्माण झाली होती. कोरोनासोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे महागाई वाढल्याचे दिसते. तसेच प्रगत देशांनी अविकसित आणि विकसनशील देशातील एफडीआयमधील गुंतवणूक कमी केली. एफडीआय ही दीर्घ गुंतवणूक असून ती अप्रगत राष्ट्रांतील विविध प्रकल्पांमध्ये गुंतवली जाते. ती कमी झाल्याने विकसनशील देशांतील परकीय चलन कमी झाले. अमेरिका आणि युरोपातील प्रगत देशांनी व्याजदर वाढवल्याने त्यांचे चलन स्वतःच्या देशात खेळते ठेवले. यामुळे भारतासारख्या अनेक विकसनशील देशांतील परकीय चलन कमी झाले.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
एकेकाळचा राष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेचा प्रतिस्पर्धी रशिया सध्या युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जेरीस आला आहे. या युद्धामुळेही जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला. तेलाचे भाव प्रचंड वाढले. महत्त्वाचे म्हणजे जगभरात कोणत्याही देशांमध्ये व्यापार होत असेल तर तो शक्यतो डॉलर या चलनात होतो. भारतालाही कोणत्याही वस्तू किंवा इंधन, सेवा आयातीसाठी डॉलर द्यावे लागतात. उदा. भारत जर इराण, रशिया किंवा आखाती देशांतून तेलाची आयात करत असेल तर तिथे डॉलर द्यावे लागतात. या युद्धामुळे पूरवठा साखळी तुटल्याने महागाई वाढली. त्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त डॉलर देशातून बाहेर जाऊ लागले. भारतातील परकीय चलनसाठा कमी होऊ लागला. ज्यामुळे आज रुपया हा डॉलरच्या तुलनेत कमकुवत होऊ पाहत आहे.
अशी वाढली महागाई-
आंतरराष्ट्रीय व्यापारात एखाद्या देशाने आयात कमी निर्यात जास्त केल्याने त्याला परकीय चलन जास्त मिळतात. गेल्या काही वर्षांच्या काळात कोरोनासारखी जागतिक महामारी, रशिया युक्रेन युद्ध आणि देशातील काही अयोग्य आर्थिक धोरणांमुळे डॉलरच्या स्वरूपातील परकीय चलनसाठा कमी झाला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात एखादी वस्तू घ्यायची असेल डॉलर द्यावे लागतात. त्यामुळे अपुऱ्या चलनसाठ्यांमुळे निर्यात कमी झाल्याने महागाईही वाढत गेली.
रुपया घसरल्याने तोटा कुणाला?
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने देशात महागाई वाढते. त्याचबरोबर याचा फटका देशातील आयातदारांना बसतो. त्यांना वस्तू आयात करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. रुपयाच्या मूल्यात घट झाल्याने आयातीचे मूल्य वाढते. भारत कच्चे तेल, कोळसा, प्लास्टिक सामग्री, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वनस्पती तेले, खते, यंत्रसामग्री, सोने, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान दगड इ. आयात करतो. मात्र, रुपयाचे मूल्य घसरल्याने निर्यात स्वस्त होईल. त्यामुळे देशात येणारे परकीय चलन कमी होते.
अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीचे उपाय
अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आयातीपेक्षा निर्यात जास्त असली पाहिजे. भारताने जास्तीत जास्त सुसज्ज मनुष्यबळ वाढवून निर्यातीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. काही वस्तूंच्या आयातीवर कडक निर्बंध केले पाहिजेत. सध्याच्या केंद्र सरकारने त्या दिशेने पाऊल टाकत सोने आयातीवरील कर वाढवला आहे. निर्यातीचे धोरण वाढवून जास्तीत जास्त परकीय चलन देशात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताने तेल आयात ही रुपयांमध्ये खरेदी करण्यावर भर दिला पाहिजे.
भारताने निर्यातीचे धोरण वाढवले पाहिजे. सुसज्ज मनुष्यबळ निर्मितीवर केंद्राने लक्ष दिले पाहिजे. वाढलेल्या बेरोजगारीवर नियंत्रण आणून रोजगार निर्मितीसाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत.
-अतुल कहाते (अर्थतज्ज्ञ)