Join us

रुपया २८ महिन्यांच्या नीचांकावर

By admin | Published: January 16, 2016 2:21 AM

सलग दुसऱ्या दिवशीही रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला. शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर विदेशी भांडवल काढण्याच्या सपाट्यामुळे निर्यातदारांकडून डॉलरची मागणी वाढली.

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशीही रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला. शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर विदेशी भांडवल काढण्याच्या सपाट्यामुळे निर्यातदारांकडून डॉलरची मागणी वाढली. परिणामी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी ३० पैशांनी घसरत प्रति डॉलर ६७.५९ रुपयांवर आला. रुपयाच्या घसरणीतील हा २८ महिन्यातील नीचांक होय.क्रूड तेलाच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीने बाजारावर परिणाम झाला. आशियात क्रूड तेलाचा भाव १२ वर्षातील नीचांक पातळीवर गेला आहे. अशात इराणने पुन्हा पुरवठा करण्याचे ठरविले असून अमेरिकेतही कच्च्या तेलाचा भरपूर साठा झाला आहे.आंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात काल गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६७.२९ रुपयांवर स्थिरावले होते. तथापि, शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही रुपयात घसरण झाली. जवळपास ०.४५ टक्क्यांनी घसरत रुपयाने २८ महिन्यातील नीचांक पातळीवर आला.यापूर्वी ३ सप्टेंबर २०१३ रोजी रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ६७.६३ रुपये होते. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी ३१७.९३ अंकांनी गडगडत दिवसअखेर २४,४५५.०४ वर स्थिरावला.रिझर्व्ह बँकेची नजरअमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६७.३८ इतके झाले असले तरीही आपली आणि रिझर्व्ह बँकेची बारीक नजर आहे, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले असून, चालू खात्यातील तूट नियंत्रणात राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.आर्थिक प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास म्हणाले की, सरकार चालू वर्षासह पुढील वर्षीही वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याच्या योजनेवर काम करील. टिष्ट्वटरवर दास यांनी हे मत व्यक्त केले आहे.ते म्हणाले की, रुपयाच्या स्थितीवर अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांची नजर असून, चालू खात्यातील तूट चालू वर्षी १.0 ते १.३ टक्क्यांच्या आत राहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.केवळ रुपयाचाच नव्हे, तर जगभरातील अन्य चलनांचेही डॉलरच्या तुलनेत मूल्य घसरत आहे. त्यातही चालू खात्यातील तूट नियंत्रणात असल्याने भारतासाठी ती एक सकारात्मक बाब आहे.दास म्हणाले की, सरकार लवकरच भविष्यात आर्थिक सुधारणांच्या उपाययोजना लागू करणार आहे. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी अन्य क्षेत्रेही खुली केली जातील. वित्तीय स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालूच राहतील. पुढील वर्षीही तूट नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जातील.शुक्रवारी व्यावसायिक सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६७.३८ एवढे झाले होते. सरकारने चालू वित्तीय वर्षात तूट ३.९ टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २0१४-१५ मध्ये ते ४.0 टक्के होते. वित्तीय परिस्थिती सुधारल्यास एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील वित्तीय वर्षात ही तूट ३.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.आंतरबँक विदेशी चलनविनिमय बाजारात पौंड, युरो आणि जपानच्या येनच्या मुकाबल्यातही रुपयात घसरण झाली.दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने संदर्भ दर ६७.४३२५ रुपये प्रति डॉलर आणि ७३.३८६८ रुपये प्रति युरो निश्चित केला होता.