Join us

रुपया घसरला: आयटी-कापड मार्केट फायद्यात तर तेल, गॅस क्षेत्रांस फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 9:39 AM

रुबल वगळता जगातील सर्व चलने डॉलरच्या तुलनेत घसरली

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध, महागाई नियंत्रणासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी व्याजदरांत केलेली वाढ आणि जागतिक मंदीची भीती यामुळे जगभरातील चलने मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात घसरली आहेत. या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे १० टक्क्यांनी घसरला आहे. 

ऑक्टोबर २०२१ रोजी १ डॉलरची किंमत ७४ रुपये होती, ती आता ८२ रुपये झाली आहे. रुपयाच्या घसरगुंडीचा आयटी, कपडे (गारमेंट्स) आणि चहा उद्योगास लाभ होईल. आयातीवर अवलंबून असलेल्या एफएमसीजी, ऊर्जा, खनिज तेल व गॅस यांसारख्या क्षेत्रांना मात्र फटका बसत आहे. यांनाही फटका रुपया घसरल्यामुळे हवाई वाहतूक व दूरसंचार क्षेत्रांचा नफा घटला आहे. औषधी आणि स्टील यांच्यावर संमिश्र परिणाम झाला आहे.

यांना होतोय लाभ

- आयटी : भारतीय आयटी कंपन्यांचा ५० ते ६० टक्के महसूल अमेरिकी डॉलरमध्ये येतो. रुपयात १ टक्का घसरण झाल्यास आयटी कंपन्यांचा परिचालन नफा ०.३० टक्के वाढतो. या तिमाहीत आयटी कंपन्यांचा सरासरी नफा १.१० टक्के वाढला आहे.

- चहा उद्योग : भारत २३ कोटी किलो चहाची निर्यात अमेरिका आणि युरोपला करतो. यंदा चहा निर्यात ५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे निर्यातदारांचा नफा २ ते ३ टक्क्यांनी वाढेल.

- कपडे : भारतातून तयार कपड्यांची सर्वाधिक निर्यात अमेरिकेला होते. डॉलर १ टक्का मजबूत झाल्यामुळे निर्यातदार कंपन्यांचा नफा ०.२५ ते ०.५० टक्के वाढेल.

यांना होतेय नुकसान

- नूतनीय ऊर्जा : रिन्युएबल एनर्जी उद्योगाचा खर्च वाढला आहे.

- खनिज तेल व गॅस : भारत ८५% तेल व गॅस आयात करतो. डॉलर महागल्यामुळे कंपन्यांचे बिल वाढते.

- एफएमसीजी : एफएमसीजी कंपन्यांच्या उत्पादन खर्चात ५० टक्के वाटा आयातीचा आहे. डॉलर महागल्यामुळे कॉस्मेटिक्स, गॅजेट्स, इलेक्ट्रिक वस्तू, घड्याळे, वस्त्रप्रावरणे, आदी वस्तूंच्या किमती वाढल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :केंद्र सरकार