ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - बँका तसेच तेल आयातदारांकडून डॉलरची होणारी मागणी याचा परिणाम भारतीय रुपयावर झाला असून गुरूवार सकाळच्या सत्रात रुपयात मोठी घसरण होऊन तो ६७.२० वर पोचला आहे. यामुळे रुपयाने गेल्या दोन वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असल्याने इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर वधारतो आहे. आज सकाळी रुपया २६ पैशांनी घसरून ६७.२० वर पोचला.
रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बॅंक डॉलरची विक्री करणार आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये रुपयाने सर्वाधिक नीचांकी पातळी गाठली होती, त्यावेळी रुपया डॉलरच्या तुलनेत ६८.८५ वर पोचला होता.
दरम्यान या घसरणीचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १०१.९५ अंकांची घसरण होऊन तो २४,७५२ वर पोचला.