मुंबई : शेअर बाजारामध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट दिसून आली. आज बाजार सुरु झाल्यावर सेंन्सेक्स 614 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि परदेशी गुंतवणूदारांनी शेअर्सची विक्री सुरुच ठेवल्याने भारतीय शेअर बाजार दबावाखाली दिसून येत आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया 73.80 रुपयांवर पोहोचला आहे.
विक्रीचा सपाटा लावल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 5 टक्क्यांनी घसरला. तर टीसीएस आणि हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्तीची घसरण झाली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर, एडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये 2.5 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली.
रिझर्व्ह बँक शुक्रवारी व्याज दरांबाबत घोषणा करणार आहे. महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ 0.25 टक्क्यांची अपेक्षित आहे. यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.