डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून रूपयाचं मूल्य सातत्यानं घसरत आहे. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "रुपया जगातील इतर चलनांच्या तुलनेत अधिक भक्कमपणे उभा राहिला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया खूप मजबूत असल्याचे दिसून येत आहे," असे सीतारामन म्हणाल्या. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"अन्य चलनांच्या तुलनेत चढ-उतार किंवा अस्थिरतेपासून कोणत्याही चलनाचा बचाव झाला असेल तर तो भारतीय रुपया आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया उत्तम स्थितीत आहे. रुपयाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. अन्य चलनांच्या तुलनेत रुपयानं चांगल्याप्रकारे पुनरागमन केलं आहे," असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.
८१ च्या जवळ
डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी रूपया ८१ रुपयांच्या जवळ पोहोचला. गेल्या काही महिन्यांपासून यात सातत्यानं घरसण दिसून येत आहे. यासंदर्भात निरनिराळे तर्क मांडले जात आहेत. शुक्रवारी यात ८३ पैशांची घसरण झाली. गेल्या सात महिन्यांमध्ये एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी घसरला होता.
सातत्यानं घसरण
अमेरिकेत व्याज दरात सातत्यानं वाढ होत आहे. या आठवड्यात अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हनं तिसऱ्यांदा व्याजदरात ०.७५ टक्क्यांची मोठी वाढ केली. यानंतर जगभरातील चलनांचं मूल्य डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरत आहे. फेडरल रिझर्व्हकडून संकेत मिळाल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदार पैसे काढत असून सुरक्षिततेसाठी अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच भारतीय रुपयासह अन्य चलनांमध्ये सध्या घसरण दिसून येत आहे.