Rupee At Record Low : अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आले आहे. निवडणूक निकालांचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे, तसतसा डॉलर मजबूत होत आहे. याचा उलट परिणाम भारतीय रुपयावर होत आहे. चलन घसरत असून विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे. आज (बुधवार) रुपया प्रति डॉलर ८४.१९ रुपये इतका नीचांकी पातळीवर घसरला असून हा ऐतिहासिक नीचांक आहे. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांच्या घसरणीने उघडला होता. चलन डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.१६ रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. यापूर्वी मंगळवारी रुपया ८४.११ च्या पातळीवर बंद झाला होता.
रिझर्व्ह बँक रुपयाला साथ देईल का?
दिवसेंदिवस रुपया कमकुवत होत चालला आहे. आता देशाच्या मध्यवर्ती बँकेला या प्रकरणात हस्तक्षेप करून रुपयाची घसरण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं दिसतंय. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपयावर उलट परिणाम झाला आहे. तो घसरणीसह उघडला असून सातत्याने खालच्या पातळीवर जात आहे. आजच्या चलनाच्या घसरणीवर नजर टाकली तर रुपया ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
इतर आशियाई चलनांची स्थिती कशी?
चायनीज युआन ते कोरियन वॉन, मलेशियन रिंगिट आणि थाई चलनातही आज मोठी घसरण झाली आहे. ते १ टक्क्यांवरून १.३ टक्क्यांनी घसरत आहेत. टक्केवारीच्या दृष्टीने भारतीय चलन या आशियाई चलनांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. परंतु, देशांतर्गत स्तरावर तो आधीच विक्रमी खालच्या पातळीवर पोहोचला आहे.
डॉलर निर्देशांक ४ महिन्यांच्या उच्चांकावर
डॉलर इंडेक्स ४ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. निर्देशांकाने १.५ टक्क्यांनी झेप घेत १०५.१९ वर पोहोचला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. याआधी ट्रम्प जिंकतील या शक्यतेने ट्रम्प ट्रेड्स नावाच्या व्यापारात गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढत असल्याने निर्देशंकात जोरदार वाढ झाली आहे.