मुंबई : २९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेलेला रुपया अल्पकालीन सुधारणेनंतर सोमवारी पुन्हा एकदा घसरला. २0 पैशांच्या घसरणीनंतर एक डॉलरची किंमत ६७.८३ रुपये झाली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस ६७.६३ वर बंद झालेला रुपया सोमवारी सकाळी वाढीसह ६७.५४ वर उघडला होता. आंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात तो आणखी वर चढून ६७.५३ वर गेला. निर्यातदार आणि बँका यांनी जोरदार डॉलर विक्री केल्याचा लाभ रुपयाला झाला होता. तथापि, नंतर ही वाढ त्याला टिकविता आली नाही. दुपारच्या सत्रात रुपया घसरणीला लागला. या घसरणीत एक डॉलरची किंमत ६७.८५ रुपयांपर्यंत गेली होती. रुपयाचा हा इंट्रा-डे नीचांक ठरला. सत्राच्या अखेरीस २0 पैशांची घसरण दर्शविताना रुपया ६७.८३ वर बंद झाला. ही घसरण 0.३0 टक्के आहे. शुक्रवारी रुपया २९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून वर चढत ३९ पैशांनी वाढला होता. ६७.६३ असा त्याचा त्या दिवशीचा बंद होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या ओपन मार्केट कमिटीची दोनदिवशीय बैठक २६ आणि २७ जानेवारी रोजी होत आहे. या बैठकीतील निर्णय बुधवारी जाहीर केले जातील. या बैठकीत ‘फेड’कडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची भीती काही प्रमाणात व्यक्त होत आहे. त्यामुळे जगभरातील चलनांवर दबाव आहे. शेअर बाजारात, तसेच सोन्या-चांदीच्या बाजारात सोमवारी तेजीचे वातावरण दिसून आले.
डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला
By admin | Published: January 26, 2016 2:31 AM