Rupees Falls : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला होता. गुंतवणूकदारही मालामाल झाले होते. अशा परिस्थितीत आधी अमेरिका आणि नंतर चीन सरकारने व्याजदर कपात जाहीर केल्याने शेअर बाजारात त्सुनामी आली. हा संपूर्ण आठवड्यात शेअर बाजारात तीव्र चढउतार पाहायला मिळाले. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार भारतीय शेअर बाजारातून पैसा काढत आहेत. या सर्व घडामोडींचा सर्वसामान्य भारतीयांच्या खिश्यावर परिणाम होणार आहे. इंधनाच्या किंमती (Petrol Diesel Price) पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
रुपयाचे लोटांगण
पहिल्यांदाच रुपया ८४ च्या खाली घसरला आहे. वास्तविक, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजार आणि रोखे बाजारात प्रचंड विक्री केली आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८४.०९७५ च्या पातळीवर घसरला. ऑक्टोबर महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ५.७ अब्ज डॉलरची मोठी विक्री केली. बाँड मार्केटमधून १२५ दशलक्ष डॉलरची विक्री झाली. मध्यपूर्वेतील संकटामुळे क्रूडच्या किमतीत जोरदार वाढ होत असल्याने भारतीय चलनावर दबाव दिसून येत आहे.
ब्रेंट क्रूडच्या वाढीमुळे रुपयावर दबाव
ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी महागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ७८-८० डॉलर प्रति बॅरलच्या श्रेणीत व्यवहार करत आहे. WTI ब्रेंटची किंमत प्रति बॅरल ७५ डॉलरच्या श्रेणीत आहे.
फेडरल रिझर्व्हकडून दर कपात अनिश्चित
भारताचा परकीय चलन साठा ७०० अब्ज डॉलर्सच्या जवळपास आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक रुपयाचे व्यवस्थापन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. परंतु सोमवारी आरबीआयने औपचारिकपणे बँकेला रुपयाच्या विरोधात जोरदार सट्टेबाजी टाळण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी अमेरिकेची फेडरल बँक यावर्षी आणखी व्याजदर कपात करेल असा अंदाज होता. मात्र, अलीकडील आकडेवारीनंतर ही शक्यता कमी होत आहे.
डॉलर इंडेक्समध्ये सतत वाढ
जगातील ६ प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दाखवणारा डॉलर निर्देशांक वाढत आहे. डॉलर इंडेक्स सध्या १०२.७ वर व्यवहार करत आहे. गेल्या ९ व्यापार सत्रांपासून डॉलर निर्देशांक सातत्याने वाढत आहे. त्यात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे.
सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
- भारत पेट्रोल-डिझेलसह ८० टक्के इंधन आयात करतो. सरकारी कंपन्या डॉलरमध्ये कच्चे तेल खरेदी करतात. रुपयाच्या घसरणीमुळे या आयातीसाठी कंपन्यांना आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे. ही महसूली तूट भरुन काढण्यासाठी इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
- इंधनानंतर खाद्यतेलाचीही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. हा व्यवहारही डॉलरमध्ये होतो. परिणामी खाद्यतेलासाठी पुन्हा जादा दाम मोजावे लागतील
- ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक पार्ट्स हे परदेशातून आयात होतो. तर लॅपटॉप, टीव्ही आणि इतर होम अपलायन्ससाठी ही काही पार्ट्स परदेशातून आयात करण्यात येतात. मोबाईलचे काही पार्टस् ही बाहेरुन येतात. हा व्यवहार डॉलरशी संबंधित असल्याने त्यांच्याही किमती वाढण्याची शक्यता आहे.