नवी दिल्ली : ‘लॉकडाऊन’मुळे भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशांमध्ये नेऊन सोडण्यासाठी ‘वंदे भारत’ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात एअर इंडियातर्फे चालविण्यात येणाºया विशेष विमानांच्या तिकिटांसाठी इच्छुक प्रवाशांची झुंबड उडाली. अवघ्या १५ तासांत या विमानांची २२ हजार तिकिटे विकली गेली.
या विशेष मोहिमेच्या तिसºया टप्प्यात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप व आॅस्ट्रेलियामधील निवडक शहरांसाठी या महिन्यात १० जून ते १ जुलैदरम्यान ३०० विशेष विमाने चालविण्यात येणार आहेत. ही तिकीट विक्री नेहमीच्या अधिकृत एजंटांमार्फत न करता फक्त एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून केली गेली. इच्छुकांनी या तिकिटांसाठी एवढी झुंबड केली की या वेबसाईटवर नेहमीच्या तुलनेत सात-आठपट अधिक ताण आला. त्यामुळे तिकिटे मिळू न शकलेल्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एअर इंडियाने तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी मुद्दाम साईट ब्लॉक करून ठेवली होती, असाही काहींनी आरोप केला.