Join us

रशिया-युक्रेन युद्ध, कोरोनामुळे भारतात न्यूजप्रिंटची तीव्र टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 6:13 AM

शिपिंग कंपन्यांकडूनही सहकार्य नाही; महागाईचे आव्हान, वर्तमानपत्रांचा अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रशिया-युक्रेन युद्धाचा फटका भारतातील वर्तमानपत्रांनादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे. अगोदरच कोरोनामुळे न्यूजप्रिंटची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आता या युद्धामुळे रशियावरील निर्बंधांमुळे न्यूजप्रिंटचा पुरवठा पूर्णत: बंद झाला आहे. शिपिंग कंपन्यांकडूनदेखील सहकार्य केले जात नसून रशियातील सेंट पीटर्सबर्ग बंदरातून न्यूजप्रिंट लोड करणे, डिलिव्हरी करणे व कुठल्याही रशियन कंपनीला कंटेनर देणे बंद झाले आहे. शिवाय, कच्च्या मालाच्या किमतीमुळेदेखील वाढ झाल्याने न्यूजप्रिंट्सचे दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

न्यूजप्रिंट हा वृत्तपत्राचा प्रमुख कच्चा माल असून, भारतीय वृत्तपत्र संस्थांकडून ५० टक्क्यांहून अधिक न्यूजप्रिंट्स विदेशातून आयात करण्यात येतात. आयात होणाऱ्या न्यूजप्रिंट्सपैकी ५५ ते ६० टक्के रशियाच्या तर उर्वरित मुख्यत: कॅनडा, अमेरिकेतील असतात. दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, रशिया या न्यूजप्रिंट उत्पादक देशांमधील गिरण्या एक तर बंद झाल्या आहेत किंवा त्यांनी पॅकिंग किंवा क्राफ्ट कागदाचे उत्पादन सुरू केले आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत सागरी मालवाहतुकीच्या दरांमध्ये तीन ते पाचपटीने वाढ झाली तसेच जगभरातील अनेक पेपरमिल बंद झाल्यामुळे न्यूजप्रिंटच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

२०२० च्या मध्यापर्यंत न्यूजप्रिंटच्या किमती साधारणत: ५०० अमेरिकन डॉलर प्रति मेट्रिक टन (४० हजार ते ४२ हजार रुपये) इतक्या होत्या. मात्र, आता वरील कारणांमुळे या किमती जवळपास ९५० ते १००० डॉलर प्रति मेट्रिक टनापर्यंत (८० हजार ते ८५ हजार रुपये) पोहोचल्या आहेत. त्यामुळे न्यूजप्रिंटच्या आयातीचे दर दुप्पट किंवा त्याहून अधिक झाले आहेत. रशियातून होणारा पुरवठा थांबल्यामुळे येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतीय कंपन्यांसमोरदेखील संकटभारतातदेखील न्यूजप्रिंट उत्पादन करणाऱ्या काही कंपन्या आहेत. या कंपन्यांनीदेखील पॅकिंग मटेरिअल व क्राफ्ट पेपर उत्पादनावर भर देण्यास सुरुवात केली आहे. या उत्पादनांना मागणीदेखील आहे व त्यांना ऑनलाइन व्यवसायामुळे चांगली किंमतदेखील मिळते. भारतात न्यूजप्रिंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या जुनी पुन:प्रक्रिया झालेली वर्तमानपत्रे, जुन्या नोटबुक्स यांचा वापर करून लगदा तयार करतात व त्यानंतर त्यातून न्यूजप्रिंट तयार होतात. या कंपन्यांनादेखील जुन्या नोटबुक्स व वर्तमानपत्रांची कमतरता जाणवत असून, त्या न्यूजप्रिंटची आवश्यकता पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. भारतीय न्यूजप्रिंटची किंमत सुमारे ३२ हजार ते ३५ हजार प्रति मेट्रिक टनाहून जवळपास ६८ हजार ते ७० हजार प्रति मेट्रिक टनावर पोहोचली आहे. जर अशीच स्थिती कायम राहिली, तर वृत्तपत्र आस्थापनांना न्यूजप्रिंटचा पुरवठा होणार नाही. वर्तमानपत्रांनादेखील इतकी मोठी भाववाढ सहन करणे कठीण झाले आहे. मागील दीड वर्षांत शाई, रसायने, ॲल्युमिनियम प्लेट्स यांच्यासारख्या इतर कच्च्या मालाच्या किमतीदेखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. शिवाय डिझेल, पेट्रोल यांच्या दरवाढीमुळे वृत्तपत्र वितरण तसेच बातम्या गोळा करण्याचा खर्चदेखील वाढला आहे. जवळपास सर्वच लहान व मध्यम वृत्तपत्र संस्था अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत.

ही आहेत इतर आव्हानेशाईच्या किमतीमध्येदेखील वाढअधेसिव्ह, ग्रेव्हर, ऑफसेट, फ्लेक्सोग्राफिक, नवीन शाई, यूव्ही इंक्स व वॉर्निश आदी शाई प्रणालीशी संबंधित वस्तूंच्या निर्मितीवर परिणामऊर्जा खर्चात वाढ, उत्पादन व मालवाहतुकीच्या खर्चावर परिणामकंटेनरची उपलब्धता, विशेष रसायनांच्या तुटवड्यासंबंधी आव्हाने अजूनही कायम आहेत.डिसेंबर २०२१ पासून ॲल्युमिनियम प्लेट्सच्या किमती एकूण २० ते ३०%नी वाढल्या आहेत.

टॅग्स :युक्रेन आणि रशिया