रशियाने युक्रेनवर हल्ले वेगवान केले आहेत. पॅराट्रूपर्सनी कीवच्या हॉस्पिटलमध्ये घुसून हल्ला सुरु केला आहे. युक्रेन मिळविण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आता मर्यादा ओलांडू लागले आहेत. खारकीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून हजारो अडकले आहेत. असे असताना भारत सरकार युक्रेन युद्धावर रशियाला नाराज न करण्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका घेत आहे. तरी देखील देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने मोठे पाऊल उचलले आहे.
युरोपीय संघटनेने रशियाच्या बँकांवर प्रतिबंध लादले आहेत. या बँकांशी एसबीआय आता कोणतेही व्यवहार करणार नसल्याचा मोठा निर्णय एसबीआयने घेतला आहे. रॉयटर्स आणि या प्रकरणाशी संबंधीत लोकांच्या हाती हे पत्र लागले आहे. या पत्राच्या आधारे ही माहिती देण्य़ात आली आहे.
एसबीआयने या बाबत आपल्या काही ग्राहकांना पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार एसबीआयने म्हटले आहे की, अमेरिका, युरोपीय युनियन किंवा संयुक्त राष्ट्रानी ज्या संस्था, बँका, बंदरे किंवा जहाजांवर प्रतिबंध लादले आहेत, त्यांच्याशी कोणत्याची प्रकारचा व्यवहार, ट्रान्झेक्शन पूर्ण केले जाणार नाही.
मनी कंट्रोलनुसार या प्रकरणी माहिती मागितली असता एसबीआयने त्यांच्या ईमेल किंवा क़ॉलला उत्तर दिलेले नाही. एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आहोत. यामुळे त्यांच्या न्यायाधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व नियमांचे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा आम्हाला हे नियम पाळले नाहीत म्हमून पाहिले जाऊ शकते.