नवी दिल्ली – अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्याचा फायदा थेट भारताला होऊ शकतो. भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करण्याची तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत या कराराच्या जवळ पोहचला आहे. या करारानुसार भारत रशियाकडून ३५ लाख बॅरेल कच्चे तेल(Crude Oil) खरेदी करेल. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोलडिझेलच्या(Petrol-Diesel) किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे.
या करारानुसार, भारताला कच्चे तेल देण्यात शिपिंग आणि इंश्योरन्सची जबाबदारी रशियाची असेल. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी भारतीय रिफाइनिंग कंपन्यांसाठी ही मोठी अडचण होती. जर हा व्यवहार करारानुसार झाला तर भारत त्याचा जुना मित्र रशियासोबत व्यावसायिक भागीदारी कायम खुली राहण्याचे संकेत आहेत. यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया एकटी पडली आहे. अमेरिकेसह आणि नाटो देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका रशियाला मोठ्या प्रमाणात होत आहे.
रशियाकडून भारताला कच्चे तेल मिळाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. परंतु रशियाकडून आता जितक्या प्रमाणात तेल मागवले आहे त्याचे प्रमाण खूप जास्त नाही. हे भारतात एका दिवसात खर्च होणाऱ्या इंधनाएवढं आहे. देशात दिवसाला ४५ लाख बॅरेल तेल वापरलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार, जर हा व्यवहार झाला तर रशियाकडून पुढील काही महिन्यात कच्चे तेल भारतात पोहचेल. मात्र अद्याप रशिया कुठल्या मार्गाने आणि कसं हे तेल भारतात पोहचवेल याचा खुलासा करण्यात आला नाही.
सोमवारी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत सांगितले की, रशियाने भारताला स्वस्त दरात तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. भारत सध्या यावर विचार करत आहे. परंतु त्याचे पेमेंट कसं होणार यावर स्पष्टता नाही. सरकारला अजून यावर विचार करायचा आहे. सरकार हा सौदा रुपये-रुबलमध्ये करण्याचा विचार आहे. त्याचं पेमेंट भारतीय बँकांच्या माध्यमातून होऊ शकतं. ज्यांच्या पाश्चात्य देशांमध्ये शाखा नाहीत. त्याचसोबत अन्य पर्यायांवर विचार सुरू आहे. पुढील काही दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
भारत आजच्या घडीला ८५ टक्के तेल आयात करतं. भारतात एप्रिल २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत ३६ लाख टन तेल आयात केले आहे. त्यातील भारत एकूण आयात १७.६ कोटी टन इतकं राहिलं आहे. रशियातून तेल आयातमध्ये शिपिंग सर्वात मोठी समस्या आहे. रशियाकडून निर्यात होणारे कच्चे तेल यूराल आणि सोकोल हे प्रमुख आहेत. यूराल तेलाची निर्यात ब्लॅक सी बंदरावरून नोवोरोसियास्कहून केले जाते. हा समुद्री मार्ग खूप लांब असल्याने खर्च वाढू शकतो. यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे इन्शुरन्स आणि वॉर रिस्क प्रिमियम वाढला आहे.
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटचं दिवाळीच्या पूर्वी बदल झाला होता. तेव्हा जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर प्रति बॅरल होती. रशिया-यूक्रेन युद्धामुळे अलीकडेच १३९ डॉलरपर्यंत भाव वाढले. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता होती. परंतु आता पुन्हा कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरल्या आहेत. आता रशियाकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा झाल्यास पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.