- नामदेव मोरेनवी मुंबई : भारतीय गव्हाची निर्यात दोन वर्षांपासून वाढू लागली आहे. यावर्षी रशिया व युक्रेन युद्धामुळे त्यामध्ये तीन पट वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दहा महिन्यांत तब्बल ६६ लाख ६९ हजार टन निर्यात झाली असून, १४ हजार ४७७ कोटींची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल तीन पट वाढ झाली आहे. जगात गहू निर्यातदार देशांमध्ये रशियाचा पहिला क्रमांक असून, युक्रेन पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळीमध्ये खंड पडला आहे. यामुळे जगभरातून भारतीय गव्हाला मागणी वाढली आहे. शासनानेही गहू निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मार्चमध्ये ‘अपेडा’ने याविषयी बैठक घेऊन निर्यातीसाठी वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतामधून २० लाख ८८ हजार टन निर्यात झाली होती. ४०३७ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान गहू निर्यातीची आकडेवारी अपेडाने ६ एप्रिलला जाहीर केली आहे. आर्थिक वर्षातील दहा महिन्यांत तब्बल ६६ लाख ६९ हजार टन निर्यात झाली असून, १४,४७७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मार्च व एप्रिलमध्येही मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, मलेशियासह विविध देशांमध्ये गव्हाची निर्यात होत आहे.
यावर्षी गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. जगभरातून भारतीय गव्हाला मागणी वाढत आहे. रशिया व युक्रेन युद्धामुळेही या मागणीत वाढ झाली आहे. - नीलेश वीरा, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
गहू निर्यातीचा तपशील वर्ष निर्यात उलाढाल (टन) (कोटी)२०१८-१९ २२६२२४ ४२४२०१९-२० २१७३५४ ४३९ २०२०-२१ २०८८४८७ ४०३७२०२१-२२ ६६६९१५४ १४४७७