रशिया आणि युक्रेनमध्ये आज युद्धाची ठिणगी उडाली. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून आज-उद्या युद्ध होईल याचा अंदाज लावला जात होता. रशियाने आज पहाटे पाच वाजल्यापासून युक्रेनवर हवाई हल्ल्यांना सुरुवात केली. क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात आली आहेत. तर युक्रेनने रशियाची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. असे असताना या युद्धाचे परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारावर झाले असून भारतातील शेअर बाजार जवळपास २७०० अंकांनी कोसळला आहे.
या युद्धाचा फटका हिरो मोटकॉर्प आणि टाटा मोटर्सला सर्वाधिक बसला आहे. निफ्टीमध्ये ८१५ अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या 16248 वर आला आहे. तर सेन्सेक्समध्ये 2702.15 अंकांची घसरण झाली असून तो सध्या 54529.91 वर आला आहे. टाटा मोटर्सचा शेअर जवळपास 10.28 टक्क्यांनी घसरला असून सध्या 427.9 वर आला आहे. टाटा पॉवरच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली आहे. टाटा पॉवरचा शेअर 7.64 टक्क्यांनी घसरून सध्या 204.30 वर ट्रेंड करत आहे. यानंतर आयआरसीटीसी 9.37 टक्के (738.05), एक्सिस बँक 6.03 टक्के, व्होडाफोन आयडिया 9.81टक्के, इंटरग्लोब एव्हीआय 10.24 टक्के,अशोक लेलँड 8.35 टक्क्यांनी घसरले आहेत.
तर हिरो मोटो कॉर्पचा शेअर 6.75 टक्क्यांनी कोसळला असून सध्या 2,490 वर ट्रेंड करत आहे. जिंदाल स्टील 8.24 टक्के, बंधन बँक 7.70 टक्के, आरबीएल बँक 11.86, गोदरेज प्रॉ़पर्टीज 9.11, एलआयसी हाऊ. फायनान्स 9.08 टक्क्यांनी घसरले आहेत. रिलायन्सचा शेअर देखील 4.98 टक्क्यांनी कोसळला आहे. टेक महिंद्राच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
बुधवारी युक्रेनने आणीबाणी जाहीर केली. यानंतर अमेरिकन बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. बुधवारी, डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी 1.38 टक्के, S&P 500 1.84 टक्के आणि नॅसडॅक कंपोझिट 2.57 टक्के घसरला. गुरुवारी जवळपास सर्व आशियाई बाजार कोसळले आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट जवळजवळ स्थिर आहे, परंतु जपानचा निक्केई किंवा दक्षिण कोरियाचा कोस्पी, या सर्वांमध्ये मोठी घसरण झाली आहे.