Petrol-Diesel Price: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटत असून कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल ११० डॉलरच्या पार गेला आहे. गेल्या सात वर्षातील हा सर्वाधिक दर आहे. जागतिक बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत चक्क पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह आज बाजारात प्रतिबॅरल कच्च्या तेलाची किंमत ११०.२३ डॉलर इतकी झाली आहे. जुलै २०१४ नंतर आज पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ११० डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
दुसरीकडे अमेरिकी वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या दरात देखील ४.८ टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सप्टेंबर २०१३ नंतर ही सर्वाधिक वाढ असून प्रतिबॅरलची किंमत १०८.४१ डॉलर इतकी झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा फटका भारतीय बाजारातही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर याचे परिणाम पाहायला मिळतील. निवडणूक निकालानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२०२१ मध्ये दिवाळीनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पण आता रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्याच किमतीत वाढ झाली आहे. युक्रेनमध्ये रशियानं मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. भारतात दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले जातात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदविण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात १० आणि ५ रुपयांची सूट देऊन जनतेला दिलासा देण्याचं काम केलं होतं. यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्येही घट केली होती.