Join us

Russia vs Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट खिशावर; तुमच्या ताटातील 'या' वस्तूनं गाठला १४ वर्षांतला उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 2:49 PM

Russia vs Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार

मुंबई: रशिया वि. युक्रेन युद्ध सुरू होऊन १० दिवस उलटले आहेत. रशियाला अद्यापही युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेता आलेली नाही. युक्रेनी सैनिक रशियाच्या बलाढ्य लष्कराला चिवटपणे तोंड देत आहेत. रशियासमोर गुडघे टेकण्यास युक्रेनी सैन्य तयार नाही. जगातील सर्वच देशांमध्ये युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. 

रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या दरानं १४ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. युक्रेनचा समावेश गव्हाचं सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत होतो. गव्हाचे दर वाढल्याचा परिणाम किचनच्या बजेटवर होत आहे. रशियानं २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. त्यामुळे काळ्या समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर परिणाम झाला. जगभरात खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. याचा फटका कोट्यवधी लोकांना बसला आहे. पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील देश मोठ्या प्रमाणात युक्रेन, रशियातून आयात करतात. गव्हाच्या जागतिक निर्यातीत रशिया आणि युक्रेनचा वाटा ३० टक्के आहे. तर युक्रेन आणि रशियाचा मक्याच्या निर्यातीतला वाटा २० टक्के आहे.

रशियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी निर्बंध लादल्यानं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे दर वाढले आहेत. सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू असल्यानं गेल्या अनेक आठवड्यांपासून इंधनाचे दर वाढलेले नाहीत. उद्या उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यातलं मतदान होत आहे. त्यामुळे परवापासून इंधनाच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर १० ते १५ रुपयांना वाढण्याची शक्यता आहे. इंधन दर वाढ झाल्यानंतर वाहतूक खर्च वाढणार असल्यानं सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढतील.

टॅग्स :युक्रेन आणि रशिया