रशिया-युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. आज तेविसावा दिवस आहे. रशियावर अमेरिकेने अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. अशावेळी रशियाने भारताला स्वस्तात क्रूड ऑईल खरेदी करण्याची ऑफर देऊ केली होती. जागतिक बाजारापेक्षा कमी दराने भारत अमेरिकेचा दबाव झुगारून तेल खरेदी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारताने अखेर तो निर्णय घेतलाच. भारत सरकारच्या दोन बड्या कंपन्यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननंतर हिंदुस्तान पेट्रोलियमने रशियाकडून तब्बल वीस लाख बॅरल क्रूड ऑईल खरेदी केले आहे. रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने भारतीय कंपन्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील किंमत वाढीचा आलेली दबाव कमी होणार आहे. तसेच देशातील इंधन दरवाढ देखील काही काळासाठी टळणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे एचपीसीएलने युरोपीय व्यापारी विटोलच्या माध्यमातून रशियाचे कच्चे तेल खरेदी केले आहे. याशिवाय मेंगलोर रिफायनरीने रशियाकडून १० लाख कच्चे बॅरल खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे. रशियावर अमेरिका, युरोपने निर्बंध लादले आहेत. यामुळे त्याच्याकडून कच्चे तेल खरेदी करण्यास अनेक कंपन्या कुचरत आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेण्यासाठी भारतीय कंपन्या पुढे सरसावल्या आहेत.
हे ऑईल थेट रशियाकडून घेतले जात नाहीय. तर ते रशियन ऑईंलचा साठा असलेल्या एजंटांकडून खरेदी केले जात आहे. इंडियन ऑईलने गेल्याच आठवड्यात लाखो बॅरल कच्चे तेल खरेदी केले होते. हे बॅरल भारताला आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा २० ते २५ डॉलरने स्वस्त पडले होते.