अमेरिकेच्या प्रतिबंधांमुळे भारतीय तेल कंपन्यांची अडचण झाली आहे. यामुळे भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यात समस्या येत आहेत. लाखो लीटर कच्चे तेल घेऊन रशियाचे टँकर भारताच्या वेशीवर घुटमळत आहेत आणि परत जात आहेत. परंतु, भारताला त्यांना पेमेंट करता येत नसल्याने महागडे तेल खरेदी करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार जी जहाजे रशियन तेल घेऊन भारतात यायची ती आता मलक्का खाडीकडे जात आहेत. डेटा इंटेलिजेंस प्रोव्हायडर केप्लरचे मुख्य क्रूड विश्लेषक व्हिक्टर काटोना यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या बंदरावर येण्यासाठी रशियन टँकर समुद्रात इकडे तिकडे भटकत राहिला होता. परंतु, भारताकडून काहीच प्रतिसाद न आल्याने तो पुन्हा माघाली वळल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच जे टँकर कच्चे तेल घेऊन भारतात यायचे ते आता दुसरीकडे वळले आहेत. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, रशियन तेल वाहून नेणारी पाच जहाजे मलाक्काच्या सामुद्रधुनीकडे जात आहेत. तर एनएस सेंच्युरी हे जहाज श्रीलंकेजवळ आहे. रशियाचा एक टँकर सात लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आला होता.
भारत युक्रेन युद्धापासून रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत होता. परंतु, आता अमेरिकेने रशियाचा पाच जहाजांवर किंमतीचे कॅप लादल्याने भारत रशियाला डॉलरमध्ये पैसे देऊ शकत नाहीय. रशियाने भारताकडे चीनच्या चलनामध्ये पैसे मागितले आहेत. परंतु, चीनशी संबंध चांगले नसल्याने भारताने यास नकार दिला आहे. चीनच्या चलनात देवान घेवान होऊ लागली तर त्याचा फायदा चीनला होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम होणार आहे.