नवी दिल्ली : टाटा उद्योग समूहाचे माजी वरिष्ठ अधिकारी एस. रामदोराई यांनी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास संस्था नॅशनल स्कील डेव्हलपमेंट एजन्सी (एनएसडीए) आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. ते पुन्हा टाटा उद्योग समूहाच्या सेवेत परतणार असल्याची चर्चा आहे. चेअरमनपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. ७१ वर्षीय रामदोराई यांनी गेल्या महिन्यातच राजीनामा दिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो मंजूर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे सचिव रोहित नंदन यांची एनएसडीएच्या हंगामी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली आहे. नंदन हे एनएसडीएचे व्हाइस चेअरमन होते. एनएसडीसीच्या बोर्डाची बैठक बुधवारी होत आहे. या बैठकीत पुढील निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.रामदोराई हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख होते. मे २0१३मध्ये त्यांनी कौशल्य विकास संस्थेचा कार्यभार स्वीकारला होता. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस आणि एअरएशिया इंडिया या अन्य टाटा समूहातील कंपन्यांचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.रामादोराई हे टाटा समूहाच्या सेवेत जातील, असा अंदाज आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टीनंतर नव्या चेअरमनच्या शोधासाठी समिती नेमली आहे. तसेच त्यानंतर टाटांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रामदोराई यांच्या टाटामधील पुन:प्रवेशाच्या शक्यता बळावल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एस. रामदोराई यांचा चेअरमनपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2016 6:10 AM