Join us

Sahara Refund Latest News: सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी गूड न्यूज, आता ₹५००००० पर्यंत क्लेम करता येणार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:33 AM

Sahara Refund Latest News: सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदार आता ५००००० रुपयांपर्यंत क्लेम करू शकतात. पाहा काय म्हटलंय सरकारनं?

Sahara Refund Latest News: सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदार आता ५००००० रुपयांपर्यंत क्लेम करू शकतात. सध्या आम्ही पाच लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी पुन्हा अर्ज स्वीकारत आहोत, अशी माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. एकूण ५,००,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या दाव्यांसाठी अर्ज करण्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. या दाव्यांवर ४५ दिवसांच्या आत कार्यवाही केली जाईल.

आतापर्यंत ३६२.९१ कोटी मिळाले

पीटीआय भाषानं दिलेल्या वृत्तानुसार. यावर्षी १६ जुलैपर्यंत सहारा समूहातील ४.२ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना ३६२.९१ कोटी रुपये परत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी संसदेत दिली. ही रक्कम सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून परत करण्यात आल्याची माहिती शाह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

सर्वोच्च न्यायालयाने २९ मार्च २०२३ रोजी दिलेल्या आदेशानंतर या पोर्टलची स्थापना करण्यात आली. वैध गुंतवणूकदारांना त्यांच्या निधीची परतफेड करण्यात मदत करणं हे त्याचं उद्दीष्ट आहे. १६ जुलै २०२४ पर्यंत सहारा समूहाच्या सहकारी संस्थांमधील ४,२०,४१७ गुंतवणूकदारांना ३६२.९१ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली.

सहारा समूहात एकूण ९.८८ कोटी गुंतवणूकदारांचे ८६,६७३ कोटी रुपये अडकले आहेत. सहारा समूहाच्या सहकारी संस्थांमधील सभासद/ठेवीदारांच्या वैध ठेवी परत करण्यासाठी आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी सहकार मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सहारा-सेबी रिफंड अकाऊंटमधून ५००० कोटी रुपये सीआरसीएस हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :गुंतवणूकसरकारपैसा