Sahara Refund Portal: सहाराच्या गुंतवणूकदारांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी ११२ लोकांच्या खात्यात १०,००० रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला. क्लेम पोर्टलवर १८ लाख लोकांनी नोंदणी केली असल्याची माहितीही यावेळी अमित शाह यांनी दिली. सरकार सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परत करत आहे.
सरकार पहिल्या गुंतवणूकदारांना ५००० कोटी रुपये परत करत आहे. १ कोटी गुंतवणूकदारांना पैसे परत केले जाणार असल्याचं अमित शाह यांनी १८ जुलै रोजी पोर्टल लाँच करताना म्हटलं होतं. अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील, असंही ते म्हणाले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा 'हा' आदेश
सर्वोत्त न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं होतं की सहारा इंडियाच्या सर्व गुंतवणूकदांना सीआरसीद्वारे पैसे परत केले जावे. आता सहारा रिफंड पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. २०१२ मध्ये सहारा सेबी फंड तयार झाला होता. सहारा सेबी फंडात २४ हजार कोटी रुपये जमा आहेत.
#WATCH | Union Home and Cooperative Minister Amit Shah transfers the claim amount to the depositors of cooperative societies of the Sahara group through the Sahara Refund Portal in Delhi pic.twitter.com/Hmfm9IqPMP
— ANI (@ANI) August 4, 2023
हे दस्तावेज बंधनकारक...
पैसे परत मिळण्यासाठी गुंतवणूकदाराकडे कंपनीचा सदस्य क्रमांक, गुंतवणूक खाते क्रमांक, आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक, ठेवीचे प्रमाणपत्र/पासबुक आणि पॅन कार्ड (गुंतवणूक ५० हजारांपेक्षा अधिक असल्यास) असणे आवश्यक आहे.
कसा करू शकता क्लेम
नोंदणीसाठी, अर्जदारांना आधार कार्डचे अखेरचे ४ क्रमांक एन्टर करावे लागतील. यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आलेला OTP टाकावा लागेल. या प्रक्रियेनंतर, 'अटी आणि शर्ती' यावर टीक करावी लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १२ अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा टाकावा लागेल. तुम्ही ओटीपी टाकताच तुमचा संपूर्ण तपशील आधार कार्डद्वारे पडताळला जाईल. यानंतर पुढील प्रक्रियेत वडिलांचे/पतीचे नाव आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. यानंतर सोसायटीशी संबंधित एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट/सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर पीडीएफ फॉर्म डाउनलोड होईल. पीडीएफ फॉर्मची प्रिन्टआऊट घेतल्यानंतर त्यावर तुमचा फोटो चिकटवा आणि सही करा. प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला तोच फॉर्म 'CRCS सहारा रिफंड पोर्टल' वर अपलोड करावा लागेल. यासोबतच तुम्हाला पॅन कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. यानंतर, नेक्स्ट/सबमिट बटणावर क्लिक करा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी नोंदणी क्रमांक तुमच्याकडे ठेवा. यासाठी तुम्हाला https://mocrefund.crcs.gov.in/Depositor/Register या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.