मुंबई : गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी सहाराने १४ राज्यांतील ४७०० एकर जमीन विक्रीला काढली आहे. एखाद्या उद्योगसमूहाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता विक्रीला काढल्याचे बहुधा हे पहिलेच प्रकरण आहे. एचडीएफसी रियल्टी आणि एसबीआय कॅपिटल मार्केट यांच्याकडून ही जमीन विक्री करण्यात येणार आहे. या माध्यमातून ६५०० कोटी रुपये उभे राहतील, असा सहारा समूहाला विश्वास आहे. सहारा समूहाने असा दावा केला आहे की, त्यांच्याकडे ३३,६३३ एकर जमीन आहे. यापैकी लोणावळ्याजवळ अॅम्बीव्हॅली सिटीमध्ये १०,६०० एकर जमीन आहे. लखनौमध्ये सहाराची एक हजार एकर जमीन आहे. सहाराचे मुख्यालयही याच शहरात आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयाने सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि संचालक अशोक रॉय चौधरी यांची चार आठवड्यांच्या पॅरोलवर सुटका केली होती. मार्च २०१४ पासून सुब्रतो रॉय हे तिहार तुरुंगात आहेत. सेबीने सर्वोच्च न्यायालयात सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, बँक गॅरंटी म्हणून ५००० कोटी रुपये ठेवण्यासाठी सहारा समूह आपली संपत्ती विकू शकतो. त्यानंतर रॉय यांना जामीन मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एचडीएफसी रियल्टी व एसबीआय कॅपिटल यांना सेबीने देशातील ६० ठिकाणची संपत्ती विकण्याची जबाबदारी दिली आहे. सहारा समूहाकडे उज्जैन, इंदोर, बरेली, अजमेर, अलिगढ, गुवाहाटी, नोएडा, मुजफ्फरनगर, लखनौ, सेलम, पोरबंदर आणि बडोदा आदी ठिकाणी जमीन आहे. यातील बहुतांश जमीन ही ग्रामीण भागात आहे आणि ती कृषी उत्पादनासाठी वापरण्यात येणारी जमीन आहे. त्यामुळे या माध्यमातून ६५०० कोटी रुपये उभे राहतील, या सहाराच्या दाव्याबाबत साशंकता आहे.
देशभरातील सहाराची ४७०० एकर जमीन विक्रीला!
By admin | Published: May 31, 2016 6:03 AM