Join us  

Diamond Industry Crisis : पगारकपात, नाेकरीवरून काढल्याने जगण्याचा प्रश्न; हिरे उद्याेगाची चकाकी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 2:00 PM

Diamond Industry Crisis : "साहेब, आत्महत्या करावीशी वाटतेय, काय करु?"; कामगारांच्या आत्महत्या वाढल्या, आले १,६०० काॅल्स

सूरत: हिरे उद्याेग हा तसा भरभराटीचा आणि श्रीमंत बनविणारा मानला जाताे. अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाेनस म्हणून फ्लॅट, तसेच कार भेट दिल्याच्या बातम्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले हाेते. मात्र, या उद्याेगाला अवकळा लागतेय की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. गुजरातच्या हिरे कामगारांच्या संघटनेने आत्महत्या राेखण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर अवघ्या महिनाभरातच १,६०० पेक्षा जास्त लाेकांनी संपर्क केला आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

नेमके काय होतेय?

  • गुजरात हिरे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष भावेश टांक यांनी सांगितले की, गेल्या १६ महिन्यांत ६५ हिरे कामगारांनी आत्महत्या केली आहे. 
  • पगारकपात तसेच नाेकरीवरून काढून टाकल्यामुळे अनेकांनी हे पाऊल उचलले आहे. हिरे उद्याेगातील मंदी, हे यामागील कारण आहे. म्हणूनच आम्ही १५ जुलैला हेल्पलाईन सुरू केली हाेती. 
  • हिरे कामगाराच्या अडचणी लक्षात घेता अनेक कंपन्या आठवड्यातील चार-पाच दिवसच काम करीत आहेत. किरन जेम्स या कंपनीने १० दिवस उत्पादन बंद करीत असल्याचे जाहीर केले हाेते.

कर्जाचे ईएमआय कसे भरू?

  • ९०% जगातील कच्च्या हिऱ्यांवर काम सूरतमध्ये करण्यात येते.
  • २,५०० पेक्षा जास्त हिरे कंपन्या सूरतमध्ये आहेत.
  • १० लाखांपेक्षा जास्त येथे कामगार आहेत.
  • ५०,००० पेक्षा अधिक जणांच्या वर्षात गेल्या नाेकऱ्या.
  • ५ दशकांत प्रथमच सलग दाेन वर्षे मंदीची झळ.

कशामुळे अडचण?

  • हिरे उद्याेगात गेल्या काही महिन्यांपासून मागणी घटली आहे. युक्रेन-रशिया युद्ध, इस्रायल-हमास तणाव तसेच चीनसारख्या बाजारपेठांमध्ये घटलेल्या मागणीमुळे  बाजारावर परिणाम झाला आहे. 
  • त्यामुळे अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. चीनमधील व्यापारी नैसर्गिक हिऱ्यांकडे पाठ फिरवीत आहेत, ही फार माेठी समस्या असल्याचे इंडियन डायमंड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दिनेश नवादिया यांनी सांगितले.

घरभाडे, शाळेच्या फीसाठी नाहीत पैसे

  • हेल्पलाईनवर काॅल करणारे कामगार अनेक समस्या सांगतात. 
  • मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, घर आणि वाहन कर्जाचे ईएमआय भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्येशिवय मार्गच उरलेला नसल्याचे कामगार म्हणतात. 
  • यासाठी मदत करण्याची विनंतीही करतात. 
टॅग्स :कर्मचारी