मुंबई: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. यंदा उत्तम पगारवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. मार्च महिन्याची सुरुवात होत असल्यानं कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कंपन्या चांगली पगारवाढ देणार असल्याचं डिलॉईट इंडियानं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
२०२१ मध्ये भारतीय कंपन्यांनी दिलेली पगारवाढ सरासरी ८ टक्के इतकी होती. यावर्षी कंपन्या सरासरी ९.१ टक्के पगारवाढ देतील असा अंदाज आहे. डिलॉईट इंडियाच्या वर्कफोर्स अँड इन्क्रिमेंट्स ट्रेंड्स सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे यंदा होणारी पगारवाढ कोरोना संकट येण्याआधी झालेल्या पगारवाढीपेक्षा जास्त असेल. २०१९ मध्ये कंपन्यांनी सरासरी ८.६ टक्के पगारवाढ दिली होती. २०२० मध्ये हा आकडा थेट ४.४ टक्क्यांपर्यंत घसरला.
२०२० मध्ये केवळ ६० टक्के कंपन्यांनी पगारवाढ दिली होती. कोरोना संकटाचा फटका बसल्यानं बऱ्याच कंपन्यांमध्ये पगारवाढ झाली नव्हती. २०२१ मध्ये ९२ टक्के कंपन्यांनी पगारवाढ दिली होती. आता बऱ्याच कंपन्यांनी पगारवाढीसाठी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. ३४ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना १० टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ देण्याच्या तयारीत आहेत.
लाईफ सायन्सेस, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, डिजिटल/ई-कॉमर्स, आयटी उत्पादन कंपन्या यंदा १० टक्क्यांहून अधिक पगारवाढ देऊ शकतात. कोरोना संकट येण्याआधी कंपन्यांनी जितकी पगारवाढ दिली होती, त्यापेक्षा जास्त पगारवाढ यंदा होईल, असं डेलॉईट टच तोहमत्सु इंडिया एलएलपीचे पार्टनर आनंदोरुप घोष यांनी सांगितलं. कंपन्यांचं कामकाज पूर्वपदावर आलं आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया वेग घेईल. आपल्याकडे असलेले कार्यक्षम कर्मचारी दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी कंपन्या उत्तम पगारवाढ देतील, असं घोष म्हणाले.