Join us

मॉस्किटो कॉईल बनवणाऱ्या कंपनीनं दिलेला Jet Airways च्या कर्मचाऱ्यांचा पगार, ED चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 10:59 AM

बंद पडलेल्या जेट एअरवेजबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

बंद पडलेल्या जेट एअरवेजबाबत (Jet Airways) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे पगार मॉस्किटो कॉइल बनवणाऱ्या कंपनीनं दिले होते. एजन्सीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांची पत्नी आणि इतरांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत आरोपपत्र दाखल केलं आहे. एस ए संगनानी अँड असोसिएट्स, मॉस्किटो कॉईल्स, केमिकल आणि फार्मास्युटिकल्स बनवणाऱ्या कंपनीने जेट एअरवेजच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला ४०.९ कोटी रुपये वेतन दिलं होतं. १३ जून २०१८ पर्यंत कंपनीची स्थापना झाली नसतानाही कंपनीनं एप्रिल २०१८ पासून पेरोल प्रक्रिया सुरू केली. कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटमध्ये याचा उल्लेख नव्हता, असं यात म्हटलं आहे.

आरोपपत्रानुसार, गोयल यांनी एचडी पाठक अँड असोसिएट्स या कन्सल्टन्सी फर्मला जनरल मॅनेजर आणि त्याहून अधिक स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेले वेतन गोपनीय ठेवण्यासाठी नियुक्त केलं होतं. गोयल यांच्या पत्नी अनिता या जेट एअरवेजमध्ये उपाध्यक्ष होत्या, तर त्यांची मुलगी नम्रता या कस्टमर सर्व्हिसमध्ये होत्या. त्याचप्रमाणे गोयल यांचा मुलगा निवान यांना खर्च कमी करणे आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशानं विभागाचे व्यवस्थापक बनविण्यात आले. गोयल यांनी कन्सल्टन्सी फर्मद्वारे पगार देण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यात २७९.५ कोटी रुपये कन्सल्टन्सी फर्मला अदा करण्यात आले आणि ते इतर भत्ते म्हणून दाखविण्यात आल्याचं यात म्हटलंय. हा व्यवहार संशयास्पद असून त्याची चौकशी सुरू असल्याचे ईडीनं स्पष्ट केलंय.कसा झाला गैरव्यवहार?ईडीनं कन्सल्टन्सी फर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांनी जेट एअरवेजच्या मॅनेजमेंटचं वेतन दिलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गोयल यांच्या सांगण्यावरु त्यांनी हे काम केलं होतं. फर्म यासाठी जेट एअरवेजकडून प्रत्येक कर्मचाऱ्यामागे महिन्याला १००० रुपये घेत होती, असं ईडीनं म्हटलंय.

जेट एअरवेज वेतनाची रक्कम पाठक एचडी अँड असोसिएट्सच्या करंट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करत होती आणि ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांचं नाव, रक्कम आणि अकाऊंटच्या डिटेल्स देण्यात येत होत्या. यानुसार शैलेश संगनानी अँड कंपनी वेतन तयार करत होतं आणि त्यानंतर त्यांच्या करंट अकाऊंटमधून वेतन कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केलं जात असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :जेट एअरवेजअंमलबजावणी संचालनालय