आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोनं (Wipro) गुरुवारी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल जाहीर केला. या अहवालात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापनाला मिळालेल्या वेतनाचाही खुलासा करण्यात आला आहे. कंपनीनं आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सर्वाधिक १६७ कोटी रुपये वेतन दिल्याचं समोर आले आहे. मात्र, ते रिशद प्रेमजी नाहीत. खरं तर ती व्यक्ती म्हणजे थिअरी डेलापोर्ट. विप्रोचे सीईओ असलेले डेलापोर्ट यांनी आता कंपनी सोडली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) रिशद प्रेमजी यांच्या वेतनात सुमारे २० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र, आर्थिक वर्षात ते कंपनीत सर्वाधिक पगार घेणारे दुसरे अधिकारी ठरले.
रिशद प्रेमजींना किती मिळालं वेतन?
रिशद प्रेमजी हे ३१ जुलै २०१९ पासून विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २००७ मध्ये ते कंपनीत रुजू झाले. मे २०१५ मध्ये मंडळात रुजू होण्यापूर्वी त्यांनी विविध पदांवर काम केलं. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये त्यांना एकूण ७,६९,४५६ डॉलर्सचं (सुमारे ६.५ कोटी रुपये) पॅकेज मिळालं. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९,५१,३५३ डॉलर (सुमारे ७.९ कोटी रुपये) या त्यांच्या कमाईपेक्षा ही रक्कम कमी होती. एकूण कम्पेन्सेशनमध्ये त्यांचा सॅलरी कम्पोनन्ट ६,९२,६४१ डॉलर (सुमारे ५.८ कोटी रुपये) होता. गेल्या वर्षीच्या ८,६१,००० डॉलर (सुमारे ७.२ कोटी रुपये) पेक्षा ही रक्कम कमी आहे. तसंच गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विप्रोच्या वाढीव एकत्रित निव्वळ नफ्यावर ०.३५ टक्के कमिशन मिळण्यास ते पात्र आहेत.
मोठं वेतन मिळणाऱ्यांमध्ये आणखी कोण?
याशिवाय कंपनीनं जतिन प्रवीणचंद्र दलाल यांच्यासह कंपनीचे माजी सीईओ थिअरी डेलापोर्ट, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सीएफओ अपर्णा सी. अय्यर यांच्या वार्षिक वेतनाचा ही खुलासा केला. त्यांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी सीएफओ पदाचा राजीनामा दिला आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विप्रोनं आपले माजी सीईओ थिअरी डेलापोर्ट यांना सर्वाधिक पगार दिला. गेल्या आर्थिक वर्षात त्यांना एकूण २.०१ मिलियन डॉलर (सुमारे १६६.५ कोटी रुपये) पगाराचं पॅकेज मिळालं होतं. या रकमेपैकी त्यांचा पगार ३९ लाख डॉलर्स होता. ५०.६ लाख डॉलर्सचा व्हेरिएबल पे होता. ४३.२ लाख डॉलर्स लाँग टर्म कम्पेसेशन म्हणून मिळाले. तर अन्य पेआऊट म्हणून ६८.४ लाख डॉलर्स मिळाले. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये त्यांचा एकूण पगार जवळपास निम्म्यानं कमी होऊन सुमारे १ कोटी डॉलर्स करण्यात आला होता.