नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेक कंपन्यांनी पगारात कपात केली आहे तर, काही कंपन्या कर्मचाऱ्यांना उशिराने पगार देत आहेत. मात्र काही कंपन्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताण कमी होत असून, त्यांना पगारासाठी महिनाभर वाट पहावी लागत नाही.
सध्या आठवड्याला पगार देण्याची पद्धत अनेक देशांमध्ये आहे. भारतामध्येही इंडियामार्टने कर्मचाऱ्यांना आठवड्याला पगार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कंपनी हा निर्णय घेण्यासाठी वर्षभरापासून विचार करत होती. कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार दिल्याने कर्मचारी खूश होतात तसेच कंपनीवरही महिन्याकाठी पगाराचा मोठा आर्थिक बोझा पडत नाही.
या देशांमध्ये दर आठवड्याला पगार
इंडियामार्ट ही देशातील साप्ताहिक वेतन देणारी पहिली कंपनी ठरली आहे. बदलता काळ आणि वाढता आर्थिक भार पाहता त्याची गरज भासत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि अमेरिका यांसारख्या अनेक देशांमध्ये आठवड्याला पगार देण्यात येतो.