Join us

चांगला पाऊस पडूनही खतांची विक्री घटली

By admin | Published: October 11, 2016 5:15 AM

यंदा उत्तम पाऊस पडलेला असतानाही रासायनिक खतांच्या विक्रीत घट झाल्याने सारेच अचंबित झाले आहेत.

नवी दिल्ली : यंदा उत्तम पाऊस पडलेला असतानाही रासायनिक खतांच्या विक्रीत घट झाल्याने सारेच अचंबित झाले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या काळात कंपन्यांनी १४३.७१ लाख टन युरियाची विक्री केली. गेल्या वर्षी याच काळात १५४.८0 लाख टनाची विक्री झाली होती. याचाच अर्थ यंदा ७.२ टक्के कमी विक्री झाली. वेगवेगळ्या मिश्रणाच्या डीएपीची विक्रीही १७.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठी फॉस्पेट आणि पोषक खतांची उत्पादक कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनलचे अध्यक्ष (कंपनी व्यवहार) जी. रवी प्रसाद यांनी सांगितले की, यंदा खरीप हंगामातील लागवडीखालील क्षेत्र वाढून ३.७ दशलक्ष हेक्टरवर गेले. याशिवाय यंदा खरिपात विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे खतांची विक्री वाढायला हवी होती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे आम्ही अचंबित झालो आहोत. यंदा खतांच्या किमतीत घट झाली आहे. डीएपीची ५0 किलोची बॅग १,२00 रुपयांवरून १,१00 रुपयांवर आली. पोटॅश ८00 रुपयांवरून ५५0 रुपये झाले. २0:२0:0 हे खत ९५0 रुपयांवरून ९00 रुपये झाले. इतरही खतांच्या किमती कमी झाल्या. या पार्श्वभूमीवरही मागणी वाढायला पाहिजे होती. पण तसे काहीच झालेले नाही. प्रसाद यांनी लिंबोळी वेस्टित युरियाचा परिणाम झाल्याचे मान्य केले. तथापि, डीएपी आणि अन्य मिश्रखतांची विक्री कशी काय कमी झाली, याचे उत्तर त्यातून मिळत नसल्याचे सांगितले. इफकोचे व्यवस्थापकी संचालक यू. एस. अवस्थी यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांतील दुष्काळामुळे खतांची कमी खरेदी झाली असावी. (लोकमत न्यूज नेटवर्क)