Join us

लक्झरी मोटारींच्या विक्रीत देशात नोंदविली २० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:11 AM

इंधनच्या वाढत्या दरांमुळे महागाई वाढत असूनही कमी अ‍ॅव्हरेज देणाऱ्या देशातील लक्झरी मोटारींची मात्र जोमाने विक्री सुरू आहे.

मुंबई : इंधनच्या वाढत्या दरांमुळे महागाई वाढत असूनही कमी अ‍ॅव्हरेज देणाऱ्या देशातील लक्झरी मोटारींची मात्र जोमाने विक्री सुरू आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ दरम्यान १६ टक्क्यांची वाढ झालेले हे क्षेत्र यंदा पहिल्या सहा महिन्यांतच सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहे. या कार्सना जादा इंधन लागते.भारतात दरवर्षी साधारण ३६ ते ३८ हजार लक्झरी मोटारींची विक्री होते. त्यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू व वोल्व्हो या तीन कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश सर्वाधिक असतो. या तीन कंपन्यांनी मिळून मागील पूर्ण वर्षात (जानेवारी ते डिसेंबर २०१७) २७,१२९ गाड्यांची विक्री केली होती. यंदा जून २०१८ पर्यंत पहिल्या सहा महिन्यांतच १४,४४३ मोटारींची विक्री या तिन्ही कंपन्यांनी केली आहे. अन्य कंपन्यांसह ही विक्री १५,५००च्या वर आहे. जानेवारी ते जून २०१७च्या तुलनेत त्यामध्ये १९.६६ टक्के वाढ झाली. सर्वाधिक ८०६१ गाड्या मर्सिडीजने विक्री केल्या आहेत, पण सर्वाधिक ३३ टक्के वाढ व्होल्वोच्या गाड्यांमध्ये झाली आहे.ई-वाहन धोक्यातदेशभरातील किमान ३० टक्के वाहने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक आधारित करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे, पण ई-वाहनांसाठीच्या पायाभूत सुविधा निर्मितीचा सध्याचा वेग पाहता, केवळ ७ टक्के वाहनेच इलेक्ट्रिक श्रेणीतील राहण्याची शक्यता बीएनईएफ या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित परिषदेत नवी दिल्लीत व्यक्त करण्यात आली आहे. पारंपरिक वाहनांखेरीज इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना रोजगार जाणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी या परिषदेत व्यक्त केली.भारतातील लक्झरी मोटार हे सातत्याने वाढणारे क्षेत्र आहे. २००८ पासून दरवर्षी या गाड्यांची विक्री सरासरी १८ टक्क्यांनी वाढली आहे. २०१० मध्ये तर त्यात ८२ टक्के वाढ झाली होती.या वाढीला नोटाबंदीचे वर्ष केवळ अपवाद ठरले. नोटाबंदीच्या काळात लक्झरी गाड्यांची विक्री आधीच्या वर्षापेक्षा ७ टक्के घटली होती. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. यावर्षीही त्यात वाढ होत आहे.

टॅग्स :कारबाजार