नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीमुळे देशातील आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र आता हे मंदीचे सावट हळूहळू दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशातील सर्वात मोठी कारनिर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकी, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या विक्रीच्या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमधून याबाबत सकारात्मक चित्र समोर आले आहे.
मारुती सुझुकी इंडियाची ऑक्टोबर महिन्यातील एकूण विक्री गतवर्षीच्या याच काळातील विक्रीपेक्षा 4.5 टक्क्यांनी वाढून 1,53,435 वर पोहोचली आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत विक्रीमध्ये 25.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने यासंदर्भातील माहिती शुक्रवारी प्रसिद्ध केली. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने 1 लाख 46 हजार 766 वाहनांची विक्री केली होती. तर सप्टेंबरमध्ये 1 लाख 22 हजार वाहनांची विक्री केली होती.
दुसरीकडे बजाज ऑटोची विक्री वार्षिक सरासरीपेक्षा 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातील सणवार हे सुद्धा विक्रीत वाढ होण्यामधील एक कारण आहेत.
त्याबरोबरच स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरसह कॉम्पॅट्क वाहन खंडामध्ये कंपनीची विक्री 15.9 टक्क्यांनी वाढून 75 हजार 094 एवढी झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हीच विक्री 64 हजार 789 एवढी होती. युटीलिटी वाहनांमधील विटारा ब्रेझा, एस क्रॉस आणि आर्टिगा यांची विक्री वाढून 23 हजार 108 एवढी झाली आहे. गतवर्षी ही विक्री 20 हजार 764 एवढी होती. तसेच कंपीनीची निर्यातसुद्धा 5.7 टक्क्यांनी वाढून 9 हजार 158 वर पोहोचली आहे.
ऑटो सेक्टरमधील मंदीचे सावट हटले? मारुती सुझुकी आणि बजाज ऑटोची विक्री वाढली
गेल्या काही महिन्यांपासून ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीमुळे देशातील आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मात्र आता हे मंदीचे सावट हळूहळू दूर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:43 PM2019-11-01T16:43:44+5:302019-11-01T16:48:06+5:30