Join us

प्रवासी वाहनांची विक्री वाढली 42 टक्क्यांनी; फाडाची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 6:47 AM

वैयक्तिक वाहनांना प्राधान्य

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या काळात साचून राहिलेली मागणी आणि वैयक्तिक वाहनांना मिळणारे प्राधान्य यामुळे जुलैमध्ये प्रवासी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली.फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन्सच्या (फाडा) वतीने जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. फाडाने म्हटले आहे की, जुलैमध्ये प्रवासी वाहनांची शोरूम विक्री ४२.१४ वाढून २,६१,७४४ वाहनांवर गेली. जूनमध्ये ती १८४,१३४ वाहने इतकी होती. कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन सदृश उपाययोजना केल्या होत्या. त्यापाठोपाठ दिल्ली, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनीही महाराष्ट्राचा कित्ता गिरवला. त्यामुळे वाहन उद्योग धास्तावला होता. कडक निर्बंधांमुळे वाहनांची विक्री ठप्प झाली होती. अनेक कंपन्यांनी  उत्पादन बंद केले होते. बजाज ऑटोने मर्यादित क्षमतेसह उत्पादन सुरू ठेवले होते. आता भारतातील कोविड संसर्ग कमालीचा घसरल्यामुळे सर्व बाजार सुरू झाले आहेत.सूत्रांनी सांगितले की, मार्च व मे २०२० मध्ये देशातील बहुतांश वाहन प्रकल्प बंद होते. काही ठिकाणी तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्पादन बंद होते.सामाजिक अंतर पडले पथ्यावरफाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, बहुतांश राज्यांनी जूनमध्ये कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामुळे जुलैमध्ये विक्रीत वाढ झाली. सर्वच श्रेणीतील वाहनांची विक्री वाढली असली तरी प्रवासी वाहनांच्या विक्रीचा आलेख सर्वाधिक उंच राहिला. कोविडकाळात बंधनकारक ठरलेले सामाजिक अंतर आणि कौटुंबिक सुरक्षेला आलेले महत्त्व यामुळे लोक वैयक्तिक वाहन खरेदीस प्राधान्य देत आहेत.