नवी दिल्ली : बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या नैसर्गिक आणि वनौषधी (नॅचरल अँड हर्बल) उत्पादन क्षेत्रात उतरल्यामुळे मार्च २०१८ ला संपलेल्या वित्त वर्षात रामदेव बाबा यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात मोठी घट झाली आहे. जीएसटीमुळे वितरण व्यवस्थेत समस्या निर्माण झाल्याचा फटकाही पतंजलीला बसला आहे.
संशोधन संस्था ‘टॉफलर’ने म्हटले की, २०१७-१८ वित्त वर्षात पतंजलीचा महसूल १० टक्क्यांनी घटून ८,१३५ कोटींवर आला. २०१६-१७ मध्ये तो ९,०३० कोटी होता. कंपनीचा नफाही अर्ध्यापेक्षा जास्त कमी होऊन ५२९ कोटींवर आला. आदल्या वर्षी तो १,१९० कोटी रुपये होता. २०१३ पासून कंपनीच्या विक्री व नफ्यात सातत्याने वाढ होत होती. वित्त वर्ष २०१७ पर्यंत कंपनीचा नफा दरवर्षी जवळपास दुपटीने वाढला.
केअर रेटिंग्ज या संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, पतंजलीने जीएसटीचा वेळेत स्वीकार केला नाही, तसेच त्यासाठीच्या योग्य त्या पायाभूत सोयी आणि वितरण साखळी निर्माण केली नाही. याचा मोठा फटका बसून कंपनीची उलाढाल घटली आहे.
सूत्रांनी सांगितले की, कंपनीचे विस्तार प्रकल्प आणि वाढलेला विक्री व वितरण खर्च ही कारणेही यामागे आहेत. हरिद्वार स्थित कंपनीने मुख्य उत्पादने, वैयक्तिक देखभाल
आणि बिस्किटे यासारख्या
शाखांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे सेवा पातळीवर काही समस्या उद्भवल्या आहेत. या मुद्यावर पतंजली समूहाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे पतंजलीची विक्री घटली
बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या नैसर्गिक आणि वनौषधी (नॅचरल अँड हर्बल) उत्पादन क्षेत्रात उतरल्यामुळे मार्च २०१८ ला संपलेल्या वित्त वर्षात रामदेव बाबा यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात मोठी घट झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:27 AM2018-12-28T06:27:35+5:302018-12-28T06:27:47+5:30