ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॉलीवुडचा दबंग अभिनेता सलमान खान नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. अभिनयासोबत तो व्यापाराच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. सलमान मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे. यातून मिळणा-या उत्पन्नाचा उपयोग समाजकार्यासाठी केला जाईल.
या वृत्तानुसार, मोबाइल मार्केटमध्ये उतरण्याची सलमानची गेल्या दोन वर्षांपासून इच्छा होती. आपल्या स्मार्टफोनच्या उद्योगासाठी मोठ्या गुंतवणुकदारांसोबत सलमानची बोलणीही सुरू आहेत. बीइंग ह्यूमन या ब्रॅंडचा मालक असलेल्या सलमानने स्मार्टफोनसाठी बीइंग स्मार्ट हे ट्रेडमार्क रजिस्टर केल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे बीइंग स्मार्ट (BeingSmart) असं त्या स्मार्टफोनचं नाव असू शकतं. ओपो, विवो, शाओमी ,मायक्रोमॅक्स आणि इंटेक्स अशा कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 20 हजारापर्यंत या फोनची किंमत असू शकते.
सर्वप्रथम ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. त्यानंतर मोठ्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. बीइंग ह्यूमनच्या आउटलेटमध्येही फोनची विक्री होईल.
बीइंग ह्यूमन ब्रॅंडच्या कपड्यांसाठी मंधाना इंडस्ट्री लिमिटेडसोबत सलमानने करार केलेला आहे. आता मोबाइल निर्मीतीसाठी तो कोणत्या कंपनीसह करार करतो ते आता पाहायचंय.