चॅटजीपीटीद्वारे अवघ्या जगाला धडकी भरवणाऱ्या कंपनीनं सीईओ आणि सह संस्थापक सॅम ऑल्टमन यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. ओपन एआयनुसार कंपनीला पुढे घेऊन जातील असा विश्वास ऑल्टमन यांच्यावर नाही, यामुळे त्यांना बाजुला करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीतच त्यांना कंपनीत पुन्हा बोलावण्यात आलंय.
सॅम ऑल्टमन पुन्हा OpenAI मध्ये परतणार असल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे देण्यात आली. सॅम ऑल्टमन यांना हटवल्यानंतर OpenAI चे अनेक कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत होते. 'एक नवीन बोर्ड मेंबर म्हणून OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांना परतीसाठी एका अॅग्रीमेंट इन प्रिन्सिपलवर पोहोचलो आहोत. यामध्ये ब्रेट टेलर, लॅरी समर्स आणि अॅडम डी-एंजेलो यांचा समावेश आहे,' असं कंपनीनं म्हटलंय.
We have reached an agreement in principle for Sam Altman to return to OpenAI as CEO with a new initial board of Bret Taylor (Chair), Larry Summers, and Adam D'Angelo.
— OpenAI (@OpenAI) November 22, 2023
We are collaborating to figure out the details. Thank you so much for your patience through this.
७०० कर्मचाऱ्यांचं बंड
ओपनएआयमधील उलथापालथीनंतर कंपनीच्या ७७० पैकी ७०० कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाविरुद्ध बंड पुकारलं होतं. तसंच सॅम ऑल्टमन आणि ग्रॅग ब्रोकमन यांना परत आणण्याच्या मागणीसह अनेक मागण्या कंपनीसमोर ठेवल्या होत्या. मागण्या मान्य न झाल्यास मायक्रोसॉफ्टनं नव्याने घोषित केलेल्या ‘ॲडव्हॉन्स एआय लॅब’मध्ये जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. नवीन संचालक मंडळ बनवून दोन स्वतंत्र संचालकांकडे कंपनीचे नेतृत्व देण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली होती.
मीरा मुरातींचीही सही
कर्मचाऱ्यांनी कंपनीला सादर केलेल्या निवेदनावर मीरा मुराती यांचीही स्वाक्षरी आहे. याशिवाय संचालक व मुख्य डाटा शास्त्रज्ञ इलिया सुतस्केवर आणि सीओओ ब्रॅड लाईट कॅप यांनीही निवेदनावर स्वाक्षरी केली.