Godfrey Phillips India Ltd : सिगारेट उत्पादक गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड (Godfrey Phillips India Ltd share) ही कंपनी सध्या चर्चेत आली आहे. प्रत्यक्षात कंपनीत अंतर्गत वाद सुरू आहे. गॉडफ्रे फिलिप्स इंडियाचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आपली आई बीना मोदी यांच्यावर कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान शारीरिक हल्ला केल्याचा आरोप केलाय.
काय आहे आरोप?
समीर मोदी यांनी दिल्ली पोलिसांकडे यासंदर्भात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, त्यांची आई बीना मोदी यांच्या पीएसओ (सुरक्षा रक्षक) यांनी त्यांना ३० मे रोजी गॉडफ्रे फिलिप्स इंडियाच्या (जीपीआय) संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्यापासून रोखले आणि त्यांच्यावर हल्ला केला, तसंच त्यांना गंभीर जखमी केलं, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.
"हा हल्ला लोभाने आणि माझ्या हक्कांपासून, वारशापासून वंचित ठेवण्याच्या हेतूनं आणि मला ठार मारण्याच्या किंवा स्वतःच्या अटींवर तडजोड करण्याच्या हेतूनं करण्यात आला होता," असं त्यांनी तीन पानांच्या तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. "माझी आई आणि भसीन यांनी या हल्ल्याचा कट रचला आणि बोर्डातील इतर विद्यमान सदस्यांनी हल्लेखोरांची बाजू घेतली. कृपया कठोर कारवाई करण्यात यावी," असंही त्यांनी म्हटलंय.
सीसीटीव्ही उपलब्ध असल्याचा दावा
हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून ते नष्ट करण्यापूर्वी ते तात्काळ ताब्यात घ्यावेत, असा दावाही मोदी यांनी केला. गॉडफ्रे फिलिप्स इंडियाकडून प्रतिक्रिया मागविलेल्या ई-मेलला प्रतिसाद मिळाला नाही. केके मोदी कुटुंबात ११,००० कोटी रुपयांच्या व्यावसायिक साम्राज्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे.
काय आहे वादाचं कारण?
गॉडफ्रे फिलिप्सच्या प्रवर्तकांमधील वादाचं मुख्य कारण म्हणजे ११,००० कोटी रुपयांच्या वारस्याचं वाटप आहे. २०१९ मध्ये कुटुंबप्रमुख के. के. मोदी यांचे निधन झाले. केके मोदी यांच्या तीन मुलांपैकी एक आणि आयपीएल माजी प्रमुख ललित मोदींचे बंधू समीर मोदी यांनी आपल्या आईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोदी यांच्या वारशात लिस्टेड कंपनी गॉडफ्रे फिलिप्समध्ये कुटुंबाचा सुमारे ५० टक्के हिस्सा आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत साडेपाच हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. मोदी कुटुंबातील इतर अनेक कंपन्यांमध्येही या कुटुंबाचे शेअर्स आहेत.